गर्दी नियंत्रित करण्यात पोलिसांना यश !

प्रयागराज, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’चा जयघोष करत वसंत पंचमीला, म्हणजे ३ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पवित्र त्रिवेणी संगमात २ कोटी ३३ लाख भाविकांनी अमृतस्नान केले. मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण करणे, हे पोलिसांपुढे आव्हान होते, त्यात पोलीस यशस्वी ठरले. सकाळपासून आखाड्यांना स्नानासाठी देण्यात आलेल्या वेळांचे सर्व आखाड्यांनी पालन केले. त्यामुळे अमृतस्नान शिस्तबद्ध, वेळेत आणि उत्साहात पार पडले. सरकारकडून याही अमृत स्नानाच्या दिवशी हेलिकॉप्टरमधून साध-संत आणि भाविक यांच्यावर पृष्पवृष्टी केली.

गर्दीचे नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी केल्या या उपाययोजना !
त्रिवेणी संगमावर जाणार्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स (तात्पुरते अडथळे) लावले होते. यामध्ये भाविकांना त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आला होता. गर्दी होऊ नये, यासाठी स्नान झालेल्या भाविकांना पोलिसांनी संगम घाटावरून त्वरित बाहेर पाठवले, तसेच संगम घाटाजवळ असलेल्या विक्रेत्यांना पोलिसांनी बाहेर काढले. आखाड्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी या मार्गावर चोख पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. या मार्गावर अन्य भाविक येऊ नयेत, यासाठी या संपूर्ण मार्गाला बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्रिवेणी मार्गावर असलेली सर्व दुकाने पोलिसांनी आदल्या दिवशी हटवली, तसेच या मार्गावर कुणालाही झोपण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. यामुळे त्रिवेणी संगमावर जाणारा मार्ग प्रशस्त झाला होता. याचा परिणाम भाविकांना सुलभतेने संगम घाटापर्यंत जाता आले.

साधू-संतांच्या प्रती भाविकांची श्रद्धा !
त्रिवेणी संगमावर जाणार्या विविध आघाड्यांनी काढलेल्या शोभायात्रेचे भाविकांनी भावपूर्ण स्वागत केले. अमृतस्नान झाल्यावर संत आणि नागा साधू ज्या मार्गावरून परतत असतांना प्रत्येक आखाडा गेल्यावर भाविक त्या मार्गावर येऊन त्या मार्गाची माती कपाळाला लावत होते. अनेक जण त्या मार्गावरील माती आेंजळीत भरून घेऊन जात होते. साधू-संतांनी भाविकांसाठी उडवलेली फुले आणि पुष्पहार घेण्यासाठी भाविक गर्दी करत होते. आखाडे स्नान करून जात असतांना परतीच्या मार्गावर दोन्ही बाजूला उभे राहून भाविक साधू-संतांना नमस्कार करत होते. शस्त्रधारी नागा साधू हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

पोलिसांचे भाविकांना सहकार्य !
परतीच्या मार्गावरून आखाड्यांच्या शोभायात्रा गेल्यावर मार्गात पडलेली फुले आणि पुष्पहार उचलून पोलीस भाविकांना देत होते. प्रत्येक आखाड्याच्या वेळी भाविकांना फुले आणि माती घेण्यासाठी पोलीस त्यांना मार्गावर सोडून त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर करत होते. अनेक पोलिसही नागा साधूंचा आशीर्वाद घेत होते. यासह अधिक गर्दी होताच पोलीस साधू-संत आणि भाविक यांच्याशी अधिक प्रेमाने अन् नम्रतेने वागून परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही घोडेस्वार पोलीस तैनात करण्यात आले होते.

स्वच्छता कर्मचार्यांनी केली रात्रभर स्वच्छता !
वसंत पंचमीच्या दिवशी स्नानासाठी कुंभक्षेत्रात आलेल्या लाखो भाविकांनी चहाचे कप, जेवणाच्या पत्रावळ्या, खाऊची वेस्टने ठिकठिकाणी फेकली होती. अनेक ठिकाणी कचर्या कुंड्यांच्या बाहेर कचरा पडला होता. ही सर्व स्वच्छता करण्यासाठी २ दिवसांपासून दिवसरात्र शेकडो स्वच्छता कर्मचारी काम करत होते. त्यामुळे अमृतस्नानाच्या आदल्या रात्रीच संपूर्ण कुंभक्षेत्रातील मार्गावर चांगल्या प्रकारे स्वच्छता दिसून येत होती. ३ फेब्रुवारी या स्नानाच्या दिवशीही स्नानाच्या मार्गावरील स्वच्छता चालूच होती. कुंभक्षेत्रात स्वच्छता राखण्यात या सर्व स्वच्छता कर्मचार्यांचे मोठे योगदान होते.
आतापर्यंत झालेल्या स्नानांच्या तुलनेत यंदा भाविकांची सर्वाधिक अल्प !वसंत पंचमीची तिथी २ फेब्रुवारीच्या रात्रीपासून चालू झाल्यामुळे प्रशासनाने २ फेब्रुवारीला रात्रीच भाविकांना स्नान करण्याची उद्घोषणा सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे अनेक भाविकांनी २ फेब्रुवारीच्या रात्रीपासून घाटांवर स्नान करणे आरंभिले. त्याची परिणीती ३ फेब्रुवारीला सकाळपासूनच गर्दी अल्प होण्यात झाली. आतापर्यंत झालेल्या स्नानांच्या तुलनेत यंदा भाविकांची सर्वाधिक अल्प होती. वसंत पंचमीच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत १ कोटी ३५ लाख भाविकांनी स्नान केले. |