Godhra Massacre Theft In Pune : गोध्रा हत्याकांडात जन्मठेप झालेल्या मुख्य आरोपीची ‘पॅरोल’वर असतांना महाराष्ट्रात चोरी !

  • मुख्य आरोपीसह ५ मुसलमानांना अटक !

  • आरोपीवर महाराष्ट्रात ३, तर गुजरातमध्ये १३ असे एकूण १६ गुन्हे नोंद !

(‘पॅरोल’ म्हणजे आरोपीला मिळणारी संचित रजा)

आळेफाटा (जिल्हा पुणे) – गुजरातमध्ये घडलेले बहुचर्चित गोध्रा हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा झालेला सलीम उपाख्य सलमान जर्दा हा आरोपी ‘पॅरोल’ रजेवर असतांना पसार झाला. त्याने या काळात महाराष्ट्रात जाऊन चोरी केली. नगर-कल्याण महामार्गावर पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या टेंपोमधून त्याने ४ जणांच्या साहाय्याने टायर चोरले. आळेफाटा पोलिसांनी गुन्ह्याचे सखोल अन्वेषण करत मुख्य आरोपीसह साहील पठाण, सुफीयान चंदकी, आयुब सुनठीया, इरफान दुरवेश यांना अटक केली आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस ठाणे आणि नाशिक जिल्यातील सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे मान्य केले असून त्याच्यावर महाराष्ट्रात ३, तर गुजरातमध्ये १३ असे एकूण १६ गुन्हे नोंद असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.

या आरोपींकडून टेम्पोसह गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल असा एकूण १४ लाख ४० सहस्र ८७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी सलमान जर्दा याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून त्या कालावधीमध्ये तो शिक्षा भोगत असतांना ८ वेळेस पॅरोल रजेवर असतांना पुन्हा कारागृहात उपस्थित न होता टोळी बनवून चोरीचे गुन्हे करत असल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला पॅरोल मिळतोच कसा ?, हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्‍न आहे. गुन्हेगार पॅरोलवर असतांना बाहेर येऊन वारंवार गुन्हेगारी कृत्ये करत असतांना त्याला पुनःपुन्हा पॅरोल मिळणे आणि त्याला व्यवस्थेकडून विरोध न होणे, अचंबित करणारे आहे !