‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांच्या) कृपेमुळे मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात यायला मिळाले. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. आश्रमात प्रवेश केल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. आश्रमात प्रवेश करताच मला थंडगार लहरी जाणवू लागल्या.
आ. मला जाणवत असलेले जडत्व दूर होऊन शरीर आणि मन यांना हलकेपणा जाणवला.
इ. दिवसभर प्रवास करून आश्रमात गेल्यावर रात्रीही मला उत्साह जाणवत होता. मला झोप आली नाही, तरीही मला कसलाही थकवा जाणवला नाही. मला रात्रीही ताजेतवाने वाटत होते.

२. ध्यानमंदिरातील चैतन्याची आलेली प्रचीती
अ. दुसर्या दिवशी सकाळी मी ध्यानमंदिरात आरतीसाठी गेले होते. तेव्हा ध्यानमंदिरात मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
आ. देवतांची आरती करतांना मला वाटत होते, ‘ती ती देवताच उपस्थित आहे.’ देवतांचे भावपूर्ण दर्शन होऊन माझी भावजागृती होत होती.
इ. श्रीकृष्णाची आरती करतांना ‘मी श्रीकृष्णाशी बोलत आहे’, असे मला जाणवत होते. श्रीकृष्ण मला म्हणत होता, ‘किती दिवसांनी आश्रमात आली आहेस, मी तुझी वाट पहात होतो.’ तेव्हा माझा श्रीकृष्णाप्रती कृतज्ञताभाव दाटून आला. ध्यानमंदिरात मला भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व अखंड अनुभवता येत होते.
ई. मी ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसले असता माझा नामजप एकाग्रतेने होत होता. मला ‘नामजप सतत करावा’, असे वाटत होते.
उ. तिसर्या दिवशी मी ध्यानमंदिरात आरतीसाठी गेले होते. तेव्हा शंखनाद झाल्यानंतर ‘संपूर्ण सृष्टीमध्ये हा नाद घुमत आहे’, असे मला वाटत होते. ‘देवता आणि ऋषिमुनी आरतीसाठी उपस्थित आहेत’, असे जाणवून माझ्या शरिरावर रोमांच आले. भगवान श्रीकृष्णाची आरती करतांना मला श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवता आले.
३. आश्रम पहातांना ‘मी देवलोकात आहे’, असेच मला वाटत होते.
४. भोजनकक्षात मला अन्नपूर्णामातेचे अस्तित्व अनुभवता येत होते.
५. आश्रमातील चैतन्यमय प्रसाद
आश्रमातील प्रसाद ग्रहण करतांना प्रसादाच्या माध्यमातून शरिरात भरपूर प्रमाणात चैतन्य जात असल्यामुळे दिवसभरात शरीर जड होणे किंवा थकवा येणे, असे काहीही जाणवले नाही.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होणारे साधक
मला वाटत होते, ‘आश्रमातील साधक निरागस असून ते भावस्थितीत आहेत.’ आश्रमातील साधकांना पाहून ‘हे सात्त्विक जीव गुरुदेवांच्या चरणांजवळ विसावले आहेत’, असे अनुभवता येत होते. मला वाटले, ‘येथे वास्तव्यास असणारे साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आले आहेत. प्रत्येक साधकाची स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी तळमळ वाढली आहे.’
७. रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम म्हणजे जणू श्रीकृष्णाची द्वारका !
अ. एरव्ही मला चालतांना आणि जिना चढतांना धाप लागते. मला भरभर चालता येत नसे, जडपणा जाणवत असे; मात्र आश्रमात मला हलकेपणा जाणवल्याने गतीने चालता येऊ लागले. मला जिना चढतांना धापही लागत नव्हती.
आ. मला वाटले, ‘श्रीकृष्ण प.पू. गुरुदेवांच्या रूपात आश्रमात वास करत आहे. आश्रम म्हणजे साक्षात् भगवान श्रीकृष्णाची द्वारका आहे; म्हणून आश्रम पुष्कळ सुंदर आहे.’
इ. अन्यत्र मला नामजप प्रयत्नपूर्वक करावा लागतो; मात्र आश्रमात माझा नामजप अखंड आपोआप चालू होता.
ई. मला सतत आनंदी आणि चैतन्यमय स्थिती अनुभवता आली. मला जाणवले, ‘आश्रमातील प्रत्येक खोलीत गुरुदेव व्यापून राहिले आहेत.’ त्यांचे अस्तित्व मला अनुभवता येत होते.
उ. ‘माझे शरीर, मन आणि बुद्धी यांवर आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण माझ्या आश्रमातील ३ – ४ दिवसांच्या वास्तव्यात निघून गेले’, असे मला अनुभवता आले.
ऊ. मी मागील वर्षी आश्रमात आले होते. ‘या वर्षी आश्रमातील चैतन्यात अनेक पटींनी वृद्धी झाली आहे’, याची जाणीव मला प्रकर्षाने झाली.
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, केवळ आपल्या कृपेमुळेच हे सर्व अनुभवता आणि शिकता आले’, याबद्दल आपल्या कोमल श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. नीला श्रीनिवास देसाई, ता. कराड. जि. सातारा (१.४.२०२३)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |