मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप
पुणे, २ फेब्रुवारी (वार्ता) – फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर चालू असलेल्या तिसर्या विश्व मराठी संमेलनाची सांगता २ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या समारंभाला अभिनेते रितेश देशमुख, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचीही उपस्थिती होती. या सांगता समारंभात रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित होते. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताने आणि ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताने समारोपीय सत्र प्रारंभ झाले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले विचार मांडले. आभार प्रदर्शनाने सांगता झाली. सांगता समारंभानंतर बहारदार गीतांचा कार्यक्रम झाला.
सनातन संस्थेच्या वतीने राज ठाकरे आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना ग्रंथ भेट !

या वेळी सनातन संस्थेच्या वतीने राज ठाकरे यांना ‘मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा’, ‘देवभाषा, वनस्पती अन् प्राणी, तसेच अन्य लोक यांच्या भाषा’, ‘भाषाशुद्धीचे व्रत’, ‘आनंदी जीवन आणि ईश्वरप्राप्ती यांसाठी सनातन संस्था’, ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ ‘सनातन संस्था : संक्षिप्त कार्यपरिचय’ आदी ग्रंथ देण्यात आले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना ‘देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये अन् संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय’, ‘मराठीला जिवंत ठेवा’, ‘आनंदी जीवन आणि ईश्वरप्राप्ती यांसाठी सनातन संस्था’, ‘गुरुकृपायोगानुसार साधना’, ‘सनातन संस्था : संक्षिप्त कार्यपरिचय’ आदी ग्रंथ भेट देण्यात आले.
संकेतस्थळावर पुस्तक प्रदर्शनालाही नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद !
विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनालाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. साधारण १०० दालनांमधील विविध प्रकारची पुस्तके घेण्यासाठी पुणेकरांनी दिवसभर गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात आयोजित केलेल्या बालसाहित्याच्या आविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.आपल्या कडील जुनी कोणतीही पुस्तके द्या त्या बदलात कोणतीही तेवढीच पुस्तके घ्या या पुस्तक आदान प्रदान कक्षाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
मराठी माणसाने अस्तित्व टिकवले पाहिजे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पुणे – मराठी विश्व संमेलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेच्या संवर्धनावर भर दिला. तीन दिवसीय साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्यात त्यांनी स्पष्ट शब्दांत मराठी भाषा, तिच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवला. मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी राज ठाकरे यांनी भाषण केले. त्यांनी साहित्यिकांना समाजाला दिशा देण्याचे आवाहन केले, सरकारला मराठी माणसांचे हक्क जपण्यास सांगितले आणि तरुण पिढीला मराठी वाचनसंस्कृती जोपासण्याचा सल्ला दिला. तसेच संमेलनातून बाहेर पडताना प्रत्येकाने किमान १० पुस्तके विकत घ्यावीत असे आवाहन केले.
राज ठाकरे यांनी भाषेच्या महत्त्वावर भर देत सांगितले की,
१. आपली मुले एकमेकांशी हिंदीत बोलत आहेत, ही चिंतेची बाब आहे. आपण जर आपल्या भाषेबाबत ठाम राहिलो, तरच जग आपल्याला किंमत देईल.
२. त्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचा उल्लेख करत विचारले की, कुठल्या राज्याचे असे स्वतंत्र गीत आहे ? यावरून त्यांनी महाराष्ट्राच्या वैभवाचा आणि इतिहासाचा पुनरुच्चार केला.
३. हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय असूनही जमीन खरेदी करता येत नाही, मग महाराष्ट्रात बाहेरचे लोक सहज भूमी का विकत घेतात ? या विधानातून त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
४. साहित्यिकांनी समाजासाठी योग्य दिशा दाखवली पाहिजे. राजकीय मते मांडणे आवश्यक आहे.
५. आपल्या महापुरुषांना जातीपातीमध्ये अडकवू नका. प्रत्येक महापुरुष हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे.
नागरिक आणि प्रशासनातील भाषा यांतील दरी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक ! – विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव
विश्व मराठी संमेलनात सावित्रीबाई फुले मंचावर ‘प्रशासनातील मराठी भाषा’ या विषयावर आयोजित परिसंवाद
पुणे – कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून नागरिक आणि प्रशासनातील मराठी भाषा यांतील दरी दूर करता येईल. प्रशासनामध्ये काम करतांना मराठी भाषा समृद्ध करणे आणि ती केवळ प्रशासनात अडकून न रहाता लोकप्रशासनाची भाषा झाली पाहिजे, या गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले. विश्व मराठी संमेलनात सावित्रीबाई फुले मंचावर ‘प्रशासनातील मराठी भाषा’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर, वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे यांनी भाग घेतला. परिसंवादाचे निवेदन बालभारतीचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की,…
१. न्यायालयामध्येही मराठी भाषा वापरायला प्रारंभ झाला आहे.
२. शासन आणि मराठी भाषा यांच्यातील दरी दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. मराठी भाषेचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध विषयांवर परिसंवाद कार्यशाळा आयोजित कराव्यात.
३. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी, तसेच वाढवण्यासाठी मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत राहू.
या परिसंवादात श्री. खारगे यांनी विश्व मराठी संमेलनात सहभागी झाल्याविषयी परदेशातून आलेल्या मराठी साहित्यप्रेमींचे अभिनंदन केले.
मराठी भाषा विभागाने भाषांतर करणारी अधिकृत यंत्रणा मजबूत करावी ! – डॉ. नीलम गोर्हे, विधान परिषद उपसभापती
विश्व मराठी संमेलनात ‘महिला कायदा आणि महिलांना न्याय’ या विषयावर आयोजित परिसंवाद !
न्यायालयांकडून दिल्या जाणार्या इंग्रजी भाषेतील निकालपत्राचे मराठीतील भाषांतर त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी नियमात प्रावधान आहे. त्यासाठी मराठी भाषा विभागाने अधिकृत भाषांतर करणारी यंत्रणा मजबूत करावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिल्या. विश्व मराठी संमेलनानिमित्त आचार्य प्र.के. अत्रे रंगमंचावर आयोजित ‘महिला कायदा आणि महिलांना न्याय’ या विषयावर आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. परिसंवादात सरकारी अधिवक्ता अधिवक्ता उज्ज्वल निकम हेही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे निवेदन अधिवक्ता अनुराधा परदेशी यांनी केले.
डॉ. गोर्हे म्हणाल्या, ‘‘न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर कसा वाढेल, याची शिफारस करण्यासाठी मराठी भाषा विभागाने ११ ऑगस्ट २०१७ च्या शासन निर्णयानुसार अभ्यासगट गठीत केला होता. त्या गटाने, निकालपत्र मराठी भाषेमध्ये देतांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी मराठी भाषा विभागाने अधिकृत भाषांतर करणारी यंत्रणा सिद्ध करावी आदी शिफारशी केल्या होत्या. त्या अनुषंगाने काम होण्याची आवश्यकता आहे.’’
अधिवक्ता निकम म्हणाले, ‘‘पोलिसांकडे तक्रार करायला पीडिता घाबरतात. झालेल्या अत्याचाराचे मराठीमध्ये वर्णन कसे करायचे, हा भेडसावणारा प्रश्न असतो. पोलीस ठाण्यामध्ये कायद्याच्या भाषेत तक्रार प्रविष्ट केली जाते. त्यामुळे कायद्याची भाषा सर्वसामान्यांना समजणारी असावी. आपण दिलेली माहिती तक्रारीत व्यवस्थितपणे लिहिली जाते का ?, हे पहायला हवे. कायद्यामध्ये मराठी शब्द समजायला कठीण आहेत, त्यासाठी पर्यायी शब्द शोधले पाहिजेत. बालकांवरील अत्याचारप्रकरणी पालकांचे दायित्व मोठे असते. बालकांना ‘चांगला स्पर्श’, ‘वाईट स्पर्श’ यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. मुलांना प्रत्येक गोष्ट शाळेतून शिकवली जात नाही. संस्कृती ही घरातून वाढीस लागली पाहिजे.’’