
न्यूयॉर्क (अमेरिका) – भारतीय हवाईदलाचे अधिकारी शुभांशू शुक्ला इतिहास रचणार आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’वर) जाणार आहेत. असे करणारे शुभांशू हे पहिले भारतीय असतील. एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत १४ दिवसांसाठी ही अंतराळ मोहीम असेल. शुभांशू यांची भारताच्या ‘गगनयान’ अंतराळ मोहिमेसाठीही निवड झाली होती. आता मात्र ‘नासा’ने माहिती दिली की, त्याने ‘अॅक्सियम मिशन-४’साठी शुभांशू यांची निवड केली आहे. या मोहिमेसाठी ‘नासा’चे ‘स्पेसएक्स ड्रॅगन’ अवकाशात जाणार आहे. नासाने ही माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. या परिषदेला अंतराळात जाणारे चारही अंतराळवीर उपस्थित होते.
४ जणांच्या या पथकाचे नेतृत्व पेगी व्हिटसन करणार असून शुभांशूखेरीज पोलंडचे स्लावोज उझनान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापु यांचा या पथकात समावेश आहे.