Taslima Nasrin On Hijab : माझ्या देशातील निर्लज्ज महिलांमुळे मला लाज वाटते !

बांगलादेशात मुसलमान महिलांकडून हिजाब अनिवार्य करण्यासाठी मोर्चा

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

नवी देहली – बांगलादेशात हिजाब अनिवार्य करण्यासाठी मुसलमान महिलांकडून मोर्चा काढण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशातून परागंदा होण्यास भाग पाडण्यात आलेल्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी मोर्चाचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, आज माझ्या देशातील निर्लज्ज महिलांमुळे मला लाज वाटते. लाजेने माझे डोके खाली झुकते.

तस्लिमा नसरीन यांनी मांडलेली सूत्रे

स्वतःला ‘लैंगिक वस्तू’ ठरवले !

मी त्यांना निर्लज्ज म्हणते; कारण त्या स्वतःला केवळ ‘लैंगिक वस्तू’ म्हणून पहातात, माणूस म्हणून नाही. त्यांचा असा विश्‍वास आहे की, जर पुरुषांनी त्यांच्याकडे पाहिले, तर ते लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होतील आणि त्यांच्यावर झडप घालतील. असा विचार करून त्यांनी स्वतःला केवळ अपमानितच केले नाही, तर पुरुषांचा अपमानही केला आहे.

इराणमध्ये मृत्यूदंड भोगावा लागत आहे !

इराण बांगलादेशापासून फार दूर नाही. या महिलांना हे ठाऊक नाही का की, इराणमधील त्यांच्या सहकारी मुसलमान बहिणींना हिजाबविरुद्ध निषेध करण्यास भाग पाडले जात आहे ? कारण त्या देशात हिजाब हा पर्याय नाही, तर तो सक्तीचा आहे ! शेकडो महिलांना हिजाब न घातल्याबद्दल किंवा योग्यरित्या न घातल्याबद्दल तुरुंगात टाकण्यात आले आहे, मारहाण करण्यात आली आहे किंवा गोळ्याही घालण्यात आल्या आहेत. आता इराणमधील महिलांनी स्वतःला झाकले नसल्यावरून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देखील भोगावी लागत आहे.

जेव्हा हिजाब अनिवार्य होईल, तेव्हा या महिलांना कळेल !

इराणी महिला हिजाबच्या तावडीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी लढत आहेत, तरीही त्या अत्याचारित महिलांशी एकता दाखवण्याऐवजी बांगलादेशी महिला स्वेच्छेने स्वतःला त्याच साखळ्यांमध्ये गुंडाळत आहेत. जेव्हा हिजाब अनिवार्य होईल, तेव्हा या महिलांना कळेल की, त्या कोणत्या भयानक सापळ्यात अडकल्या आहेत. जरी त्यांना तो काढायचा असेल, तरी त्या तो काढू शकणार नाहीत; कारण तो काढणे म्हणजे मृत्यूला तोंड देणे. आज त्यांनी स्वतःहून घातलेला हिजाब उद्या असह्य यातना बनेल.

मोर्चा काढणार्‍या महिलाच महिलांच्या शत्रू !

बरेच लोक म्हणतात की, महिलाच महिलांच्या शत्रू आहेत. मी सहसा असे मानत नाही; पण ढाक्यामध्ये हिजाबच्या बाजूने मोर्चा काढणार्‍या महिलांना पाहून मला शंका नाही की, त्या महिलांच्या शत्रू आहेत !

महिलाद्वेषींची बाजू घेतली !

स्त्रीवाद्यांनी महिलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी लढा दिला; परंतु या बुरखा (चेहरा आणि शरीर झाकण्याचे वस्त्र) घातलेल्या महिलांनी त्या प्रगतीला १० पावले मागे खेचले आहे. स्त्रीवादी आणि महिलाद्वेषी यांच्यातील लढाईत या महिलांनी महिलाद्वेषींची बाजू घेतली आहे.

भुतांनी भरलेले ढाका विद्यापीठ !

एकेकाळी ढाका विद्यापीठ महिला मुक्ततेचा गड होता. आज ते मदरशांमधून अज्ञानी, तसेच धार्मिकदृष्ट्या बुद्धीभेद केलेल्या दयनीय ‘झोम्बीं’नी (भुतांनी) भरलेले आहे. चला एक मिनिट शांतता पाळूया.

संपादकीय भूमिका

  • इराणमध्ये मुसलमान महिला गेल्या २ वर्षांपासून हिजाबच्या विरोधात प्रखर आंदोलन करत असतांना आता धर्मनिरपेक्ष बांगलादेशात हिजाब अनिवार्य करण्याच्या मुसलमान महिलांकडून होणार्‍या मागणीतून त्या किती बुरसटलेल्या आहेत, हेच दिसून येते.
  • बांगलादेश आता कट्टर इस्लामी देश होऊन आत्मघाताकडे वाटचाल करत आहे, हेच यातून स्पष्ट होते !