Mahakumbh Snan : महाकुंभ येथे २ फेब्रुवारीपर्यंत ३४ कोटी भाविकांनी संगमावर केले स्नान !

  • २ ते ४ फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज शहरात वाहनांना प्रवेशबंदी !

  • व्हीआयपी पास रहित !

प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – महाकुंभाचा आजचा २१ वा दिवस आहे. २ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत ९७ लाख भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले होते. १३ जानेवारीपासून ते आतापर्यंत एकूण ३४ कोटी ५७ लाख भाविकांनी संगमावर स्नान केले आहे. भाविकांची गर्दी आणि सुरक्षा लक्षात घेऊन हेलिकॉप्टरमधून भाविकांच्या गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे, तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २ ते ४ फेब्रुवारीपर्यंत कुंभक्षेत्री आणि प्रयागराज शहरात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अतीमहनीय (व्हीआयपी) नेत्यांचे प्रवेश पास रहित करण्यात आले आहेत. संगमाकडे जाणार्‍या प्रत्येक मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत वाहनांना सोडले जाणार नाही.

१. महाकुंभक्षेत्री एका ठिकाणी पोलिसांनी गाडी सोडण्यास नकार दिल्यानंतर एका साधूने बॅरिकेड्स (अडथळे) काढून बळजोरीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी साधू आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली.

२. प्रयागराज येथे सेक्टर २ येथे भाविकांची प्रचंड गर्दी आहे. तेथून भाविक प्रयागराज रेल्वे स्थानक, रामबाग, सुबेदारगंज आणि प्रयाग स्थानक येथे जात आहेत.

३. लहान-मोठ्या वाहनांसाठी वेगवेगळी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व रेल्वे स्थानकावर जा-ये करण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था केली आहे. एका बाजूने भाविक आले, तर दुसर्‍या बाजूने भाविकांना बाहेर पाठवण्यात येईल. भाविकांसाठी प्रशासनाने सर्व पांटून पूल (तात्पुरते बांधण्यात आलेले पूल) खुले केले आहेत.