Guidelines For Devotees : मौनी अमावस्येच्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून भाविकांना घाटांवर न थांबण्याची सूचना !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – मौनी अमावास्येच्या दिवशी कुंभमेळ्यात अमृतस्नानाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ३ फेब्रुवारी असलेल्या अमृतस्नानाच्या दृष्टीने प्रशासनाकडून सावधगिरीची पावले उचलण्यात येत आहेत. स्नानासाठी त्रिवेणी संगमावर गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांनी त्रिवेणी संगमाऐवजी घाटांवर स्नान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तसेच स्नान झाल्यावर घाटावर न थांबण्याची सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मौनी अमावास्येच्या दृर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर १ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाकुंभमेळ्यात ध्वनीवर्धकाद्वारे याविषयीची सूचना सातत्याने देण्यात येत आहेत. मौनी अमावास्येनंतर महाकुंभक्षेत्रातील गर्दी अल्प झाली होती. ३ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या अमृतस्नानाच्या निमित्ताने महाकुंभक्षेत्रात येणार्‍या भाविकांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. मौनी अमावास्येच्या दिवशी पहाटे स्नानासाठी भाविकांनी रात्रीपासूनच त्रिवेणी घाटावर प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी थोपवणे पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेले. त्यामुळे ३ फेब्रुवारीच्या स्नानासाठी त्रिवेणीवर गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. त्रिवेणी संगमावरील येणार्‍या भाविकांचे अन्य घाटांवर विभाजन करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

तात्पुरते बांधलेले पूल बंद करण्याची शक्यता !

अमृत स्नानाच्या दिवशी पांटून पूल (तात्पुरते बांधलेले पूल) बंद करण्यात येऊ शकतात, अशी सूचना प्रशासनाकडून ध्वनीवर्धकावरून देण्यात येत आहे. मौनी अमावास्येच्या दिवशी पांटून पुलांवर प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. त्रिवेणी संगमावरील पांटून पुलावर झालेल्या गर्दीमुळे भाविकांनी पुलावरून खाली उड्या मारल्या होत्या.

प्रशासनाने ही दक्षता घ्यावी !

पांटून पूल बंद केल्यास वृद्ध, महिला, बालक आदी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यासाठी पांटून पूल बंद करण्याऐवजी कोणते पांटून पूल महनीय व्यक्तींसाठी आहेत, कोणते भाविकांसाठी आहेत, याविषयी नागरिकांना वेळीच सूचना देणे आवश्यक आहे. त्याविषयीचे फलक पांटून पुलाच्या पूर्वीच मार्गावर लावणे आवश्यक आहे. पांटून पुलावर भाविकांना एकदम जायला देण्याऐवजी गटागटाने पाठवणे आवश्यक आहे. नवीन येणार्‍या भाविकांना क्षेत्राची माहिती नसल्यामुळे स्नानासाठी कुठे जायचे, हे नेमके लक्षात येत नाही. नागरिक घंटोन्घंटे भरकटतात आणि जागोजागी त्यांना पोलीस अडवतात. यामुळेच माघी अमावास्येच्या दिवशी भाविक संतापाले होते. त्यामुळे नागरिकांना घाटावर जाण्यासाठी कोणते मार्ग आहेत, त्याच्या सूचना मार्गांवर ठिकठिकाणी लावणे आवश्यक आहे.