मुंबई – अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यात महाराष्ट्राला पुढील लाभ झाले आहेत.
रेल्वे आणि दळणवळण
महाराष्ट्राला ‘एम्युटीपी ३’ (मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३) साठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींचे प्रावधान करण्यात आले. मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत २३० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या ४ प्रकल्पांसाठी ४ सहस्र ३ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी १२६ कोटी ६० लाख, मुंबई मेट्रोसाठी १६३७ कोटी ४१ लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळ सुधारणांसाठी ६८३ कोटी ५१ लाख मिळाले आहेत.
कृषीशी संबंधित लाभ
महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी ५९६ कोटी ५७ लाख, ऊर्जा संवर्धन आणि लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी १८६ कोटी ४४ लाख, इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी ६५२ कोटी ५२ लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी १०९४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला. नागनदी सुधार प्रकल्पांचा लाभ होणार आहे. ‘विदर्भ मराठवाडा कापूस-सोयाबीन उत्पादकता वाढवण्यासाठी योजने’च्या संदर्भातही लाभ होईल.
पंतप्रधान धनधान्य योजनेंतर्गत शेती उत्पादकता वाढ, शेतमाल साठवणूक सुविधा, सिंचन, क्रेडीट सुविधांवर भर देणार असून १०० जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्याचा लाभ महाराष्ट्राला होईल. कापूस-डाळींच्या उत्पादनवाढीचे निर्णय राज्याच्या लाभाचे आहेत.
उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान
महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. सरकारी शाळांमध्ये ५ लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा-आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करून देणे याचा लाभ राज्यातील युवकांना होणार आहे.