संपादकीय : तुलसी गॅबर्ड विजयी भव ।

तुलसी गॅबर्ड

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदी डॉनल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर आता तेथे वादळ उठले आहे. मुळात नोव्हेंबर महिन्यात झालेला त्यांचा विजय पचवणेच तेथील अनेक प्रथितयश नागरिकांना कठीण झाले होते. ‘डीप स्टेट’चा डाव संपूर्ण फसला होता. त्यामुळेच जॉर्ज सोरोस, बिल गेट्स, बराक ओबामा आदींचे धाबे दणाणले. हे तेच शक्तीशाली चेहरे आहेत, जे जगातील सर्वांत शक्तीशाली देशाचे, म्हणजेच अमेरिकेचे राजकारण हाकतात आणि पर्यायाने जागतिक राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे. गेल्या काही वर्षांत अनेक देशांमधील सत्ता उलथवून लावण्यामागे त्यांचाच हात असल्याचे म्हटले जाते. ‘जो बायडेन’ हा त्यांचा मोहरा ! एवढेच काय, तर जगाला घरात बंद करणार्‍या ‘कोरोना विषाणू’चा उगमही याच ‘डीप स्टेट’ची करामत असल्याचे म्हटले जाते. ‘प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी षड्यंत्र असते’, असे सांगणार्‍यांना ‘कॉन्स्पिरसी थिअरिस्ट’ या नावाने हिणवण्याची परंपरा अमेरिकेत जुनी आहे. सरकारविरोधी वक्तव्य करणार्‍या अशांमध्ये सध्या अग्रक्रमावर ज्यांचे नाव घेता येईल, ते एलेक्स जोन्स यांचे ! त्यांनी ‘चीनच्या वुहानमधील एका प्रयोगशाळेत कोरोना विषाणू प्रथम मिळाला’, हे केवळ एक माध्यम असून यामागील अदृश्य हात हे अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’चे तत्कालीन अध्यक्ष अँथनी फॉसी आणि अब्जाधीश बिल गेट्स यांचे आहेत’, असा दावा केला होता. याचे अनेक पुरावेही त्यांनी सार्वजनिक केले होते. ज्याप्रमाणे ६० वर्षांपूर्वीच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ्. केनेडी यांच्या हत्येमागील गूढ समोर आणण्यासाठी ट्रम्प तत्पर झाल्याचे त्यांनी निवडणुकांआधी घोषित केले होते, त्याप्रमाणेच केवळ ४ वर्षे लोटलेल्या कोरोना महामारीचे भयावह सत्यही आता त्यांनी उघड केले पाहिजे. त्याचाच आरंभ म्हणून कि काय; परंतु आता ट्रम्प यांनी सरकारी खर्चातून फॉसी यांना मिळणारी सुरक्षा काढून घेतली आहे.

धडाकेबाज ट्रम्प !

डॉनल्ड ट्रम्प आणि तुलसी गॅबर्ड

ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ हा विशेषकरून अपारंपरिक असणार, असा अनुमान आहे. ‘कॅनडाने अमेरिकेत विलीन व्हावे’, असे धाडसी (आऊट ऑफ द वर्ल्ड) वक्तव्य, डेन्मार्क देशाचा अविभाज्य भाग असलेल्या ग्रीनलँडला विकत घेण्याचा व्यक्त केलेला मानस, अनेक राष्ट्रांना मिळणारे अमेरिकी अर्थसाहाय्य काढून घेण्याचा घेतलेला निर्णय आदी गोष्टी त्याच दिशेकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. यात भर पडली आहे, ती अमेरिकी समाजाला अडचणीच्या वाटणार्‍या माजी खासदार तुलसी गॅबर्ड यांचे ‘डी.एन्.आय.’, म्हणजेच ‘डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (‘राष्ट्रीय गुप्तचर’च्या संचालिका)’ या पदासाठी स्वत: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या नामांकनाची ! ‘राष्ट्रीय गुप्तचर’ ही संस्था अमेरिकेतील १८ गुप्तचर संस्थांचे उत्तरदायित्व पहाते. याच्या संचालक पदावरील व्यक्ती ही थेट अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना आढावा देत असते.

आंतरराष्ट्रीय डावपेच छुप्या पद्धतीने खेळणार्‍या एवढ्या धोरणी पदासाठी स्वत:ला ‘हिंदु अमेरिकन’ असे अभिमानाने सांगणार्‍या एका महिलेला राष्ट्राध्यक्षांनी पुढे आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचाच परिणाम कि काय; परंतु ‘लेफ्ट-राईट’, म्हणजेच डावे असोत कि उजवे दोन्ही पक्षांचे अनेक खासदार माजी खासदार असलेल्या तुलसी गॅबर्ड यांच्या ‘टॉप पोस्ट’साठी अडथळे ठरत आहेत. तुलसी यांच्या नामांकनासंदर्भातील बैठकीत त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. ‘अमेरिकेची गोपनीय माहिती (क्लासिफाईड इन्फर्मेशन) रशियाला देणारे एडवर्ड स्नोडेन यांना तुलसी यांनी पाठिंबा दिला होता’, ‘सीरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष (हुकूमशाह) बशर अल्-असद यांची तुलसी यांनी वर्ष २०१७ मध्ये घेतलेली भेट’, आदींचे भांडवल या बैठकीत केले गेले. या सगळ्या आरोपांना तार्किकदृष्ट्या का असेना, तुलसी पुरून उरल्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देतांना धीरगंभीर मुद्रेत आणि स्थिर ध्वनीत त्यांनी सुनावले की, माझ्यावर एकाच वेळी ‘ट्रम्प यांची कळसूत्री बाहुली’, ‘पुतिन यांची कळसूत्री बाहुली’, ‘असद यांची कळसूत्री बाहुली’, ‘मोदी यांची कळसूत्री बाहुली’, असे आरोप केले जात आहेत. एकाच वेळी अशा सर्वांच्या हातची बाहुली होणे शक्य तरी आहे का ? मुळात मी माझ्या विरोधकांच्या हातची बाहुली नसल्यामुळे ही पोटदुखी आहे, हेच खरे आहे, असे अत्यंत मार्मिक स्वरात त्यांनी सुनावले.

धर्मप्रेम असावे, तर असे !

यापेक्षा तुलसी यांनी भारतियांसाठी आणि त्यातही सर्वत्रच्या हिंदूंसाठी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, ‘अनेक अमेरिकी खासदारांना (जे मला विरोध करत आहेत, त्यांना) धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थही कळत नाही आणि अमेरिकी राज्यघटनेतील कलम ६ च्या अंतर्गत ‘कोणत्याही सरकारी पदासाठी कुणाची धार्मिक ओळख हा निकष ठरू शकत नाही’, यास ते मानत नाहीत. हे दुर्दैवी आहे की, त्यांचे सध्याचे धार्मिक कट्टरतेचे खूळ हे हिंदु धर्म आणि हिंदूंच्या विरोधातील आहे. माझ्या हिंदु ओळखीमुळे मी त्यांच्या निशाण्यावर आहे.’ भारतातीलही अनेक हिंदु खासदारांनी त्यांची मान खाली घातली पाहिजे, असे तुलसी यांचे धर्मप्रेमाने ओतप्रोत भरलेले हे

वक्तव्य ! मुळात अमेरिकी राजकारणात हिंदूंना विशेष अधिकार कधीच मिळाले नाहीत. अमेरिकेतील सर्वांत उत्पादक क्षमता ही हिंदूंची असतांनाही त्यांची ‘लॉबी’ तेथे अस्तित्वात नाही. ‘सनातन प्रभात’शी बोलतांना अमेरिकेत उदयास येत असलेला राजकीय हिंदु चेहरा असलेल्या पूर्णिमा नाथ यांनी याविषयी सांगितले होते की, अमेरिकी राजकारणी हे कट्टर ख्रिस्ती असून हिंदूंना तेथील राजकारणात पुढे येऊ देत नाहीत. बॉबी जिंदाल या अमेरिकी हिंदु नेत्याला यामुळेच धर्मांतर करावे लागले होते. त्यामुळे जगाला धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचे धडे देऊ पहाणार्‍या अमेरिकेत तुलसी यांचा निभाव लागेल का ?, हा येणारा काळ सांगेल; परंतु धर्माला स्वत:च्या खांद्यावर घेऊन मिरवणार्‍या (वेअरिंग धर्म ऑन द स्लीव्हस) तुलसी या हिंदूंसाठी आशेचे किरण आहेत, हे खरे ! नाही म्हटले, तरी अमेरिकी राजकारणात ‘डीप स्टेट’चा संपूर्ण प्रभाव काही उतरू शकत नाही; परंतु तुलसी गॅबर्ड या ४३ वर्षीय युवा महिला नेत्याला हिंदूंकडून ‘विजयी भव ।’च्या शुभेच्छाच !

भारताला लोकशाहीचे धडे देणारी अमेरिका तेथील हिंदु राजकारण्यांना त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे पुढे येऊ देत नाही, हे जाणा !