इंधन पुरवठा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला !
वास्को, ३१ जानेवारी (वार्ता.) – दाबोळी जंक्शन परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खोदकाम करतांना भूमीगत
इंधनवाहू वाहिनी फुटल्याने मोठी खळबळ माजली. मुरगाव बंदरातून या वाहिनीमधून पेट्रोल आणि डिझेल सांकवाळ येथील पठारावरील ‘झुआरी इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (झुआरी आय.ए.व्ही.) या आस्थापनाच्या टाक्यांमध्ये वाहून नेले जाते. त्या वेळी मुरगाव बंदरातून वाहिनीतून करण्यात येणारा इंधनाचा पुरवठा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना ३१ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता घडली. या घटनेनंतर दाबोळी जंक्शन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दक्षतेचा उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि आपत्कालीन सेवा तत्पर ठेवण्यात आल्या.
मुरगाव बंदरात नौका इंधन घेऊन आल्यानंतर इंधनाचा साठा भूमीगत वाहिन्यांद्वारे ‘झुआरी आय.ए.व्ही.’मध्ये पोचवला जातोआणि नंतर तो साठा गोव्यातील विविध पेट्रोलपंपांवर पाठवला जातो. दाबोळी जंक्शनच्या पूर्वी असलेल्या महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम चालू होते. ‘ब्रेकर’ यंत्र घालून खोदकाम करण्यात येत होते आणि यामुळे भूमीगत इंधनवाहू वाहिनी फुटली. जेव्हा या वाहिनीतून इंधन पुरवठा केला जात नाही, तेव्हा या वाहिनीत सुरक्षेच्या दृष्टीने हवा भरून ठेवली जाते. ‘रिकाम्या पेट्रोलियम वाहिनीमध्ये अडकलेली हवा बाहेर येऊ लागल्याने स्थानिकांना गॅस गळती होत असल्याचा संशय आला आणि त्यांनी तात्काळ सतर्कता बाळगली’, अशी माहिती ‘झुआरी आय.ए.व्ही.’
या आस्थापनाच्या अधिकार्यांनी दिली. त्याचप्रमाणे ‘झुआरी आय.ए.व्ही.’च्या अधिकार्यांना वाहिनीतील हवेचा दाब अल्प
होत असल्याचे कळताच त्यांना वाहिनी फुटल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वास्को पोलीस ठाण्याचे निरीक्षक कपिल नायक आणि वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी पथकासह धाव घेतली. ‘झुआरी आय.ए.व्ही.’चे टर्मिनल व्यवस्थापक श्रीप्रसाद नाईक हे देखील घटनास्थळी आले. या वेळी पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी मार्गाने वळवली आणि दुपारी १.३० वाजता या मार्गावरील वाहतूक पूर्ववत् करण्यात आली.
माहिती देऊनही फोडली वाहिनी !
‘झुआरी आय.ए.व्ही.’चे टर्मिनल व्यवस्थापक श्रीप्रसाद नाईक म्हणाले, ‘‘फुटलेल्या वाहिनीतून १ फेब्रुवारीपासून इंधन पुरवठा चालू केला जाणार होता आणि ही घटना जर १ फेब्रुवारी या दिवशी घडली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. आता या वाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी पुढील ३-४ दिवस लागणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्या ठेकेदाराला भूमीगत वाहिनीविषयी माहिती देऊनही त्यांच्याकडून ही मोठी चूक झाली.’’ (अशांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)
१५ दिवस पुरेल एवढा इंधनाचा साठा उपलब्ध
‘झुआरी आय.ए.व्ही.’चे टर्मिनल व्यवस्थापक श्रीप्रसाद नाईक म्हणाले, ‘‘जनतेने पेट्रोल-डिझेल पुरवठ्याविषयी चिंता करू नये. गोव्यातील सर्व पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल यांचा पुढील १५ दिवसांसाठी पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. वाहिनी दुरुस्तीसाठी ३-४ दिवस लागणार असल्याने बंदरात इंधन घेऊन येणार्या नौकांचे आगमन पुढील काही काळासाठी पुढे ढकलले जाणार आहे.’’