सातारा, ३१ जानेवारी (वार्ता.) – कराड तालुक्यातील श्री क्षेत्र पाल हे देवस्थान ‘ब’वर्ग देवस्थान आहे. येथे येणार्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून देवस्थानाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पाल देवस्थानाला पर्यटनस्थळ घोषित करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, श्री क्षेत्र पाल देवस्थानाला पर्यटनस्थळ घोषित करण्यासाठी सर्व तांत्रिक गोष्टींचा विचार करून परिपूर्ण प्रस्ताव १ मासाच्या आत सादर करावा. पर्यटनासाठी शासकीय जागेस प्राधान्य देण्यात यावे. आपली संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, तसेच पर्यटन यांविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी पर्यटनस्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती तंत्र करण्यात येणार आहे. यासाठी सेवानिवृत्त पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि इतर संस्था यांच्या वतीने या नेमणुका करण्यात येणार आहेत. महाबळेश्वर येथे होणार्या ‘महाराष्ट्र पर्यटन महोत्सवा’मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ५० पर्यटन पोलीस यांना विशेष प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचार्यांची माहिती लवकरात-लवकर सादर करावी. पर्यटन पोलीस हे पर्यटनस्थळावरील शाश्वत पर्यटनपद्धतीचे जतन आणि संवर्धन यांसाठी निश्चितच प्रयत्न करतील.