मूर्तीकारांची मते जाणून घ्यावीत ! – मुंबईतील मूर्तीकारांची मागणी

‘पीओपी’वरील बंदीचे प्रकरण

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – ३० जानेवारी या दिवशी ‘पीओपी’च्या (‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या) गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. माघी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने ‘पीओपी’च्या गणेशमूर्तींवर बंदी असल्याचा पुनरुच्चार केला होता. ६ जानेवारीला मुंबई महापालिकेने याविषयीचे पत्रकही काढले होते. आता न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील विविध मूर्तीकारांनी ‘याविषयी मूर्तीकारांची मते जाणून घ्यावीत’, असे आवाहन केले आहे.

‘पीओपी मूर्तींमुळे प्रदूषण होते का ?’, याची वैज्ञानिकदृष्ट्या पडताळणी करा. हा विषय विघटनाशी संबंधित आहे, प्रदूषणाशी नाही. ‘राज्य सरकार आणि महापालिका यांसमवेत मूर्तीकारांना बैठकीला कधीच बोलावले जात नाही’, अशी खंत ‘कलागंध आर्ट्स’चे मूर्तीकार सिद्धेश दिघोळे यांनी व्यक्त केली आहे.

‘पीओपीसारखेच अन्य पर्याय आम्हाला सुचवावेत. अन्य पर्यावरणपूरक साधनांमधूनही मूर्ती घडवतांना बर्‍याच समस्या आहेत; मात्र आमच्या सूचना जाणूनच घेतल्या जात नाहीत’, अशी खंत मूर्तीकार संतोष कांबळी यांनी व्यक्त केली आहे.

‘ऐन उत्सवाच्या तोंडावर बंदीच्या कार्यवाहीचे सूत्र मांडले जाते. केंद्रीय प्रदूषण मंडळाने ‘पीओपी’ मूर्तींवर बंदी घातली असली, तरी त्याला कायदेशीर अधिष्ठान नाही. पर्यावरणावर नेमका काय आघात होतो, याचाही वैज्ञानिक अभ्यास झालेला नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांनाच आम्ही याचिकेद्वारे आव्हान दिलेले आहे’, असे म्हणणे मूर्तीकारांच्या संघटनेचे ज्येष्ठ अधिवक्ता संजीव गोरवाडकर यांनी मांडले.

संपादकीय भूमिका

मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे प्रदूषण होऊ शकते. ‘पीओपी’ने पाण्याचे प्रदूषण होत नाही, असा अहवाल ‘सृष्टी इको रिसर्च’ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिला आहे. असे असूनही ‘पीओपी’मुळे पाण्याचे प्रदूषण होते, असे वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येते. ‘पीओपी’ नको असेल, तर प्रशासनाने योग्य अभ्यास करून मूर्तीकारांना शाडूमातीसारखे खर्‍या अर्थाने पर्यावरणपूरक पर्याय मुबलक प्रमाणात प्रथम उपलब्ध करून देणे आवश्यक नाही का ?