नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारणीसाठी १२ सहस्र ८०९ कोटी रुपयांचा व्यय अपेक्षित !

सातारा, ३१ जानेवारी (वार्ता.) – महाबळेश्वर गिरीस्थान क्षेत्रातील पर्यटनाचा ताण अल्प करण्यासाठी राज्यशासनाने नवीन महाबळेश्वर प्रकल्प हाती घेतला आहे. ‘राज्य रस्ते विकास महामंडळा’च्या वतीने या प्रकल्पाचा प्रारूप विकास आराखडा हरकतींसह घोषित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १२ सहस्र ८०९ कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे.

राज्य सरकारने १०० दिवसांच्या उद्दिष्टानुसार या प्रकल्पावर वेगाने काम चालू केले आहे. इको टुरिझम पर्यटनाला चालना मिळेल, या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न चालू आहेत. यामध्ये टुरिस्ट पॅराडाईज, सायकल ट्रॅक, छोटी विमानतळे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. यासाठी सरकारकडून विविध प्रक्रिया राबवण्यात आली आहे, तसेच खगोलप्रेमींसाठी ‘डार्क स्काय पार्क रेट व्हिलेज’ म्हणजे आकाशातील तारे स्पष्टपणे पहाण्यासाठी पाटण तालुक्यातील हरळ आणि काठी या भागात ‘डार्क स्काय पार्क’ उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पाविषयी ६१३ हरकती आल्या आहेतः प्रकल्प आराखड्यामध्ये पाटण तालुक्यातील बाजे येथे ०.४५ किलोमीटर ते २ किलोमीटर अंतराचे छोटे विमानतळ, तसेच उरमोडी येथे २ किलोमीटर लांबीची ‘सी प्लेन’ धावपट्टी निर्माण केली जाणार आहे. तापोळा येथे ‘सी प्लेन’ उतरवण्याची सुविधा करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. बाज येथील विमानतळामुळे वाल्मिकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहज पोचणे शक्य होणार आहे, तसेच बामणोली, ठोसेघर, कास पठार या भागाचाही पर्यटकांना आनंद घेता येणार आहे.