Tulsi Gabbard Slams Democratic Senators : अमेरिकेतील डेमोक्रॅटिक खासदार हिंदूंविरुद्ध धार्मिक कट्टरता वाढवत आहेत !

अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय गुप्तचर’च्या संचालिका तुलसी गॅबर्ड यांनी सुनावले !

अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय गुप्तचर’च्या संचालिका तुलसी गॅबर्ड

वॉशिंग्टन (अमेरिका) – राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या मंत्रीमंडळात ‘राष्ट्रीय गुप्तचर’च्या संचालिका असलेल्या भारतीय वंशाच्या तुलसी गॅबर्ड यांनी डेमोक्रॅटिक खासदारांवर हिंदु आणि हिंदु धर्म यांविरोधात कट्टरता पसरवल्याचा आरोप केला आहे. गॅबर्ड म्हणाल्या की, डेमोक्रॅटिक पक्ष हिंदूंविरुद्ध धर्मांधतेला प्रोत्साहन देत आहे. भूतकाळात, डेमोक्रॅटिक खासदारांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या काही न्यायिक उमेदवारांविरुद्ध, जसे की, एमी कोनी बॅरेट आणि ब्रायन बुएशर यांच्याविरुद्ध ख्रिस्तीविरोधी कट्टरतेचा अवलंब केला आहे. त्या वेळी संसदेत डेमोक्रॅट म्हणून मी त्या कृतींचा निषेध केला होता; कारण धार्मिक कट्टरतेचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे, मग तो कोणताही धर्म असो. दुर्दैवाने असे काही डेमोक्रॅट खासदार आहेत, ज्यांना धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ समजत नाही आणि अमेरिकेच्या राज्यघटनेतील कलम ६ नुसार कोणतेही सरकारी पद मिळण्यासाठी तुमची धार्मिक ओळख आवश्यक नाही, याकडे ते कानाडोळा करतात. आता ते (माझ्या निवडीवरून) हिंदु धर्माच्या विरुद्ध धर्मांध कट्टरता पसरवत आहेत. जर कुणाला प्रामाणिकपणे हिंदु धर्माबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर ते माझ्या ‘एक्स’ खात्याला भेट देऊ शकतात. तेथे मी या विषयावर अधिक माहिती देईन.

१. भारताविरुद्ध विचारलेल्या प्रश्‍नाचे तुलसी गॅबार्ड यांनी उत्तर देतांना सांगितले की, अमेरिकी लोकांच्या हत्येला कोणताही परदेशी देश निर्देशित करत असणे, ही गंभीर चिंतेची घटना आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे.

२. वर्ष २०२३ मध्ये न्यूयॉर्क शहरात एका अमेरिकी नागरिक असलेल्या शीख कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रयत्नाचे नेतृत्व केल्याचा आरोप करणार्‍या आरोपावरील प्रश्‍नाला गॅबर्ड उत्तर देत होत्या. कॅनडाच्या अधिकार्‍यांनी जून २०२३ मध्ये हरदीप सिंह निज्जर या कॅनडाच्या नागरिकाची हत्या केल्याचा आरोप भारत सरकारवर केला आहे.

भारत अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार !

तुलसी गॅबर्ड म्हणाल्या की, भारत हा इंडो-पॅसिफिक प्रदेशातील एक महत्त्वाचा आर्थिक आणि सुरक्षा भागीदार आहे. जर कोणताही आरोप झाला असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशीचे निकाल आणि गुप्तचर माहिती राष्ट्रपती आणि धोरणकर्ते यांना पुरवली पाहिजे जेणेकरून ते कथित घटनेशी तसेच द्विपक्षीय संबंधांशी संबंधित सर्वोत्तम निर्णय घेऊ शकतील.

संपादकीय भूमिका

हिंदूंची बाजू ठामपणे मांडणार्‍या तुलसी गॅबर्ड यांचे आभार ! भारतातील किती खासदार संसदेत किंवा सरकारी स्तरावर हिंदूंची बाजू मांडत असतात ?