Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या  फलकांना पोलिसांचा विरोध

प्रयागराज कुंभपर्व २०२५

‘सनातन प्रभात’च्या पत्रकाराने जाब विचारल्यावर फलक परत दिले !

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – कुंभनगरीत सेक्टर १९ येथे ३१ जानेवारीला आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी हिंदु जनजागृती समितीचे काही साधक फलक घेऊन जात होते. त्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी साधकांना हटकले आणि फलक पाहून ते जप्त करून पोलीस ठाण्यात नेले. या वेळी उपस्थित असलेल्या ‘सनातन प्रभात’च्या पत्रकारांनी पोलिसांना याविषयी जाब विचारल्यावर पोलिसांनी ते परत केले.

१. रात्री १ ते दीडच्या सुमारास काही साधक दुचाकीवरून हे फलक घेऊन जात असतांना गस्तीवरील पोलिसांनी त्यांना हटकले. या वेळी फलक पाहून त्यावर हिंदु राष्ट्र अधिवेशन या विषयी लिहिलेले लिखाण वाचून त्यांनी साधकांना ‘तुम्हाला माहिती नाही का ? या शब्दावर बंदी घातली आहे.’

२. त्यावर साधकांनी ‘हिंदु राष्ट्र या शब्दाला बंदी आहे का ?’, असे विचारले. त्यावर पोलिसांनी ‘तसे नाही काही दिवसांपूर्वी मेळा क्षेत्रात असलेले हिंदु राष्ट्राविषयीची फ्लेक्स फलक प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे हे फलक तुम्हाला लावता येणार नाही’, असे सांगितले.

३. त्यानंतर पोलिसांनी ‘१ फलक सोडून उर्वरित फलक घेऊन जाऊ शकतात’, असे सांगितले.

४. साधकांनी फलक मागितल्यावर पोलिसांनी ‘पोलीस ठाण्यात या’, असे सांगितले; मात्र प्रत्यक्षात जप्त केलेला फलक त्यांनी तेथेच ठेवला असल्याने साधकांनी त्यांना तो देण्यास सांगितला. उपस्थित पोलीस अधिकार्‍याने ‘तुम्हाला हे लावता येणार नाही’, असे सांगितले.

‘सनातन प्रभात’च्या पत्रकाराने खडसावल्यावर पोलिसांकडून गयावया !

त्यावर तेथे उपस्थित ‘सनातन प्रभात’च्या पत्रकाराने या शब्दावर तुमचा आक्षेप आहे का ? तेव्हा पोलिसांनी ‘तुम्ही हे लावू शकत नाही’, असे सांगितले. त्यावर पत्रकाराने असे आहे, तर हे फलक जप्त केल्याविषयी आम्ही तुमच्या नावाने बातमी लावतो, तर तसे तुम्हाला चालेल का ? त्यासाठी तुमचे नाव सांगा. यावर संबंधित पोलीस अधिकार्‍याने गयावया करून हात जोडून कृपया याविषयी बातमी लावू नका. तुम्ही फलक घेऊन जाऊ शकता, असे सांगितले. तेव्हा साधक फलक घेऊन आले.

(हिंदु राष्ट्राचे फलक काही दिवसांपूर्वी काढतांना पोलीस प्रशासनाने समितीला पूर्वकल्पना का दिली नाही ? तसेच याचे कारणही दिले नाही. पुन्हा या फलकाला विरोध करून पोलीस प्रशासनातील काही घटक त्यांची हिंदु राष्ट्रविरोधी मानसिकताच दाखवत नाही का ? योगी आदित्यनाथ यांनी पोलीस आणि प्रशासन यांतील अशा मानसिकतेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना समज द्यावी, अशी धर्मनिष्ठ हिंदू अपेक्षा करतात. – संपादक)

संपादकीय भूमिका

प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनात हिंदु राष्ट्रविरोधी मानसिकतेचे पोलीस असणे अपेक्षित नाही !