गुरुदेवांप्रती श्रद्धा वृद्धींगत होण्‍यासाठी महालक्ष्मीमातेकडे मागायची धनसंपदा !

‘महालक्ष्मी ही धन, ऐश्‍वर्य, समृद्धी आणि संपत्ती यांची देवता आहे. ‘आपण महालक्ष्मीमातेला प्रार्थना कशी करायला हवी ?’, याविषयी आणि आपल्‍यामधील गुरुदेवांप्रतीच्‍या श्रद्धेविषयी’ गुरुदेवांच्‍या कृपेने सुचलेले विचार येथे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
महालक्ष्मीदेवी

१. महालक्ष्मीमातेकडे मागायची धनसंपदा

१ अ. महालक्ष्मीकडे प्रार्थना करतांना आवश्‍यक तेवढेच धन आणि आपल्‍या साधनेला पूरक असणारे ‘भक्‍तीधन’ मागणे : महालक्ष्मीमातेला प्रार्थना करतांना देवीकडे मायेतील धन, म्‍हणजेच ‘पैसा, सोने, अलंकार ’ हे न मागता ‘भक्‍तीधन’ मागू शकतो. व्‍यवहारात एखाद्या व्‍यक्‍तीकडे पैसा, सोने किंवा अलंकार नसल्‍यास ती व्‍यक्‍ती गरीब असतेे आणि तिला भीक मागावी लागते. त्‍याचप्रमाणे अध्‍यात्‍मात आपल्‍याकडे भक्‍तीरूपी धन नसेल, तर आपण अध्‍यात्‍मात भिकारीच होऊ.

कु. अपाला औंधकर

देवीकडे प्रार्थना करतांना आपल्‍याला आवश्‍यक तेवढेेच धन आणि आपल्‍या साधनेला पूरक असणारे ‘भक्‍तीधन’ मागूया. अध्‍यात्‍मातील या भक्‍तीधनाने आपण अध्‍यात्‍मात श्रीमंत होऊ, म्‍हणजेच देवाला अपेक्षित असे होऊ आणि आपल्‍याला त्‍याच्‍याकडे लवकरात लवकर जाता येईल.

१ आ. महालक्ष्मीकडे मायेतील संपत्ती न मागता सद़्‍गुणांची संपत्ती मागितल्‍यावर ईश्‍वराकडे लवकर जाणे शक्‍य होणेे : आपण महालक्ष्मीमातेकडेे मायेतील संपत्ती न मागता सद़्‍गुणांची संपत्ती मागू शकतो. एखाद्या व्‍यक्‍तीकडेे अल्‍प संपत्ती असल्‍यास तिला समाजात मान मिळत नाही, त्‍याचप्रमाणे आपल्‍याकडे सद़्‍गुणांची संपत्ती नसल्‍यास आपल्‍याला ईश्‍वराकडे कसे जाता येईल ? आपल्‍यात विविध गुण वृद्धींगत करून ती संपत्ती आपल्‍याकडे असल्‍यास आपल्‍याला निश्‍चितच ईश्‍वराकडे लवकरात लवकर जाता येईल.

१ इ. नवरात्री आणि दीपावली यांच्‍या कालावधीत अन् धनत्रयोदशीच्‍या दिवशी आपण माता महालक्ष्मीकडे आवश्‍यक तेवढेच मायेतील धन आणि आपल्‍या साधनेला पूरक असणारेे ‘भक्‍तीधन’, तसेच ‘सद़्‍गुणांची संपत्ती’ मागूया.

२. ‘गुरुदेव अंतर्यामी असल्‍याने ते सर्व जाणतात’, अशी दृढ श्रद्धा हवी !

एकदा माझ्‍या मनात विचार आला, ‘मी गुरुदेवांना आत्‍मनिवेदन करते आणि त्‍यांना प्रार्थना करते, ती त्‍यांच्‍यापर्यंत पोचते का ?’ तेव्‍हा मला जाणीव झाली, ‘असा विचार मनात आल्‍यास आपली श्री गुरूंप्रती श्रद्धा अल्‍प आहे’, असे समजू शकतो. गुरुदेव साक्षात् त्रैलोक्‍याचे योगीराज आहेत. ते प्रत्‍येक जिवाचे कल्‍याण करतात. त्‍यांना प्रत्‍येक जिवाची व्‍यथा ठाऊक आहे आणि त्‍यांचे प्रत्‍येक जिवाकडे लक्ष आहे. असे असतांना आपण बुद्धीने विचार करतो, ते अयोग्‍य आहे.’ ‘गुरुदेव स्‍थुलातील आणि सूक्ष्मातील सर्व जाणतात. त्‍यांच्‍यापर्यंत सर्वकाही पोचते’, याची पोचपावती गुरुदेव मला योग्‍य वेळी निश्‍चितच देतील.

३. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘हे गुरुवरा, आपणच सारे काही सुचवणारे आहात. यात माझे काहीच नाही. हे गुरुदेवा, तुम्‍ही आम्‍हाला या जन्‍मी लाभले आहात, तर आम्‍हाला तुम्‍हाला अपेक्षित असे आमच्‍या जीवनाचे सार्थक करता येऊ दे. आम्‍हाला आपल्‍या चरणांचाच ध्‍यास सतत लागू दे. आमची आपल्‍या प्रती श्रद्धा वृद्धींगत होऊन आम्‍हाला आपल्‍या चरणी एकरूप होता येऊ दे’, अशी मी आपल्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– कु. अपाला औंधकर (वर्ष २०२४ मधील आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (२२.१०.२०२२)