‘ज्ञानयोगानुसार साधना केल्यास ती प्रामुख्याने बुद्धीने होते. कर्मयोगानुसार साधना केल्यास ती शरीर आणि बुद्धी यांनी होते, तर भक्तीयोगानुसार साधना केल्याने ती मन, बुद्धी आणि शरीर यांद्वारे होते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२६.६.२०२३)
३० जानेवारी या दिवशी आपण या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/879144.html

२. विविध योगमार्गांनुसार साधना केल्यावर मनोलय होण्याची प्रक्रिया
२ इ. भक्तीयोग
२ इ १. भक्तीयोगात साधकाचे मन भाव आणि भक्ती अनुभवत असल्यामुळे त्याचा शीघ्र मनोलय होणे : ‘अन्य सर्व योगमार्गांच्या तुलनेत भक्तीयोगाचे महत्त्व अधिक आहे; कारण त्यात साधकाचे मन हेच साधनेचे म्हणजे मनोलयाचे माध्यम होते. ज्ञानयोगात बुद्धीला, तर कर्मयोगात शरीर आणि बुद्धी यांना मनावर योग्य संस्कार करावे लागतात. त्यामुळे या प्रक्रियेत बुद्धी आणि शरीर मनाला सूचना देत असल्यामुळे त्या स्वीकारण्यास मनाचा संघर्ष होतो; याउलट भक्तीयोगानुसार साधना करणार्या साधकाचे मन हेच साधनेचे माध्यम होतेे. त्यामुळे जेव्हा साधक मनातून भाव आणि भक्ती अनुभवतो, तेव्हा ते अनुभव तात्कालिक रहात नाहीत. त्या अनुभवांमुळे साधकाच्या मनावर साधनेचे योग्य संस्कार होतात. या प्रक्रियेत साधकाचे मन भावावस्था किंवा भक्ती यांतील गोडवा अनुभवते. त्यामुळे मनच पुढाकार घेऊन विविध देह, उदा. शरीर, चित्त आणि बुद्धी यांना साधनेकडे नेते. भक्तीयोगानुसार साधना करतांना भक्ताच्या मनाचा संघर्ष होत नाही आणि झाल्यास भावाच्या बळावर त्याला अल्प काळात त्या संघर्षावर मात करणे सहज शक्य होते. त्यामुळे भक्तीयोगातून साधना करणार्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते.
२ इ २. भावस्थितीचे टप्पे

२ इ २ अ. देवाप्रती भावना निर्माण होणे : या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात साधकात ‘भावनिक भाव (भावनेची प्रधानता असलेला भाव)’ निर्माण होतो. त्यामुळे साधकाला त्याच्या मनातील भावाप्रमाणे ठराविक कृती, उदा. ‘उपवास करणे, भजन म्हणणे, चप्पल न घालता वारी करणे’ इत्यादी गोष्टी करायला आवडते. त्यासाठी त्याच्या मनाची तन झिजवण्याची आणि धनाचा त्याग करण्याची सिद्धता असते. याप्रमाणे भावनिक भावाच्या टप्प्याला मन शरिराला साधनेत सहभागी करून घेते.
२ इ २ आ. व्यक्त भाव निर्माण होणे : भावनेच्या माध्यमातून साधना करतांना साधकाची साधना जसजशी वाढते, तसतसा त्याच्या मनामध्ये देवाच्या सगुण रूपाशी निगडित ‘व्यक्त भाव’ निर्माण होतो. ‘व्यक्त भाव’ अनुभवतांना त्याच्या मनात ‘आता मी अनुभवत असलेला हा क्षण अनमोल असून तो जपण्यासाठी मला झोकून देऊन पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत’, असे तीव्र विचार निर्माण होतात. मनाच्या या आवेगामुळे केवळ मनच नाही, तर देह, बुद्धी, असे सर्वच देह त्या क्षणाचा आनंद अनुभवण्यासाठी प्रेरित होतात. यामुळे जीव ‘स्वेद (घाम), स्तंभ (एकाच जागी थिजून जाणे), रोमांच (अंगावर काटा उभा रहाणे), स्वरभंग (आवाजात पालट होणे), कंप (शरिराला कंप फुटणे), वैवर्ण्य (चेहर्याचा रंग बदलणे), अश्रू (डोळे भरून येणे) आणि प्रलय (मूर्च्छित होणे)’, असे अष्टसात्त्विक भाव अनुभवतो.
‘व्यक्त भाव’ सगुणाशी निगडित असल्यामुळे तो ठराविक वेळेसाठी जागृत होतो. असे असले, तरी त्यातून जीव काही प्रमाणात आत्मानंदाची अनुभूती घेतो. या अनुभूतींमुळे बुद्धीची कार्यरतता आणि त्यामुळे साधनेच्या संदर्भात निर्माण होणारे नकारात्मक विचार न्यून होतात. त्यामुळे साधनेचे प्रयत्न करण्यास मनाला शरिराच्या समवेत बुद्धीचीही साथ मिळते. त्यामुळे साधकाचे साधनेचे प्रयत्न पुष्कळ वाढतात.
२ इ २ इ. अव्यक्त भाव निर्माण होणे : साधकाची साधना याच्या पुढच्या टप्प्यात गेल्यावर साधकात ‘अप्रकट भाव’ किंवा अव्यक्त भाव निर्माण होतो. ‘कृतज्ञताभाव’ हे अप्रकट भावाचे लक्षण आहे. यामुळे साधक कृतज्ञतेच्या भावाने सर्व कर्मे करतो. तेव्हा त्याच्या मनात त्या कर्मातून काही मिळवण्याची अपेक्षा नसून ‘देव किंवा गुरु यांच्यासाठी किती करू ?’, असे समपर्णाचे विचार असतात.
ज्याप्रमाणे सतत नामजप केल्यामुळे मनावर नामजपाचा खोलवर संस्कार होऊन अन्य सर्व स्वभावदोषांशी निगडित संस्कार न्यून होतात, त्याचप्रमाणे साधकाच्या मनावर कृतज्ञतेच्या भावाचा संस्कार खोलवर होत जाऊन अन्य सर्व स्वभावदोष न्यून होतात. या पूर्ण प्रक्रियेत मनच पुढाकार घेऊन शरीर आणि बुद्धी यांनाही त्या कर्मात समावून घेते. त्यामुळे भक्तीयोगातून साधना केल्यामुळे साधकाचे तन, मन, बुद्धी आणि अहं यांचा त्याग होण्यास साहाय्य होते अन् त्यामुळे त्याची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते; म्हणून प.पू. भक्तराज महाराज म्हणायचे, ‘सर्व योगामार्गांमध्ये भक्तीयोग सर्वश्रेष्ठ आहे.’
२ ई. गुरुकृपायोग
२ ई १. गुरुकृपायोगात गुरु त्या-त्या काळासाठी आवश्यक अशा साधनेच्या माध्यमातून शिष्याची साधना करून घेत असल्याने त्याचा शीघ्रातीशीघ्र मनोलय होणे : गुरुकृपायोगात श्री गुरु काळानुसार योग्य मार्गदर्शन करत असल्यामुळे शिष्याचा लवकर मनोलय होतो. भक्तीयोगासह अन्य सर्व योगमार्गांतील सर्वांत मोठा अडथळा, म्हणजे त्यामध्ये काळानुसार साधना शिकवली जात नाही. त्यामुळे ‘वर्तमान परिस्थितीनुसार व्यष्टी किंवा समष्टी साधनेचे प्रयत्न कसे केले पाहिजेत ?’, हेच जिवाला कळत नसल्यामुळे त्याला मिळालेल्या अमूल्य मानवी जीवनातील वेळ व्यर्थ जातो. गुरुकृपायोगात श्री गुरु शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही घटकांपैकी काळानुसार ज्या माध्यमातून शिष्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे, त्याविषयी त्याला मार्गदर्शन करतात. काही वेळा साधकाला या मार्गदर्शनामागील कार्यकारणभाव त्या क्षणी कळलेला नसतो, तरीही साधक श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधनेचे प्रयत्न करतो. तेव्हा ती स्वेच्छा नसल्यामुळे साधकाचा मनोलय होऊन त्याची आध्यात्मिक प्रगती होते.
श्री गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानून प्रयत्न केल्यामुळे शिष्याचा शीघ्रातीशीघ्र मनोलय होऊन त्याची आध्यात्मिक प्रगती होते. त्यामुळे प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘भक्तीयोग श्रेष्ठ आहे’, असे सांगितल्यावर शिष्य डॉ. आठवले यांनी अंतःप्रेरणेने त्यांना सुचल्यानुसार सांगितले होते, ‘भक्तीयोगाच्या तुलनेतही ‘गुरुकृपायोग’ श्रेष्ठ आहे.’
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘भक्तीमुळे साधनेला पूर्णत्व मिळते’, असे सांगणे
‘भक्ती’ म्हणजे निरपेक्ष समर्पण ! साधनेचे प्रयत्न, म्हणजे दिव्यातील तेल असेल, तर भक्ती (समर्पण) म्हणजे दिव्यातील वात आहे. तेल (साधना) आणि वात (समर्पण) यांची एकरूपता झाल्यावरच जीवरूपी दिव्यात आत्मज्योत प्रकाशित होते. कुठल्याही योगमार्गाने व्यष्टी साधना केली, तरी ईश्वराशी एकरूप व्हायला पुढे समष्टी साधना करावीच लागते. समष्टी साधनेत ज्ञान, भक्ती आणि कर्म तिन्हींचा वापर करावा लागतो. त्यामुळे कुठल्याही योगमार्गाने साधना केली, तरी शेवटी साधकाला भक्ती करावीच लागते. ज्ञानयोगी आद्य शंकराचार्य हेही भक्तीला शरण गेले (म्हणजे त्यांनी भक्ती केली) आणि मगच त्यांना उच्च असे ‘धर्मसंस्थापनेचे समष्टी कार्य’ करता आले.
‘कुठल्याही योगमार्गाने व्यष्टी साधना केली, तरी ईश्वराशी एकरूप व्हायला पुढे समष्टी साधना करावीच लागते. समष्टी साधनेत ज्ञान, भक्ती आणि कर्म तिन्हींचा वापर करावा लागतो.’ – श्री. निषाद देशमुख (३०.६.२०२३)
‘भक्तीमुळे (समर्पणामुळे) साधनेला पूर्णत्व येते’, हे महत्त्वपूर्ण शास्त्रच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्तमान कलियुगातील समष्टीला समजेल’, अशा सरळ सोप्या भाषेत सांगितले आहे. या मार्गदर्शनातून त्यांनी ‘भविष्यात येणार्या स्थुलातील आपत्काळात तरण्यासाठी देवाची अनन्य भक्ती करणे’, हाच एकमात्र उपाय आहे’, हा संस्कार समष्टीच्या मनावर केला आहे’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०२३, दुपारी ४.५५ ते ७.०५ आणि ७.४५ ते ८.३०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |