वक्त्यांनो, सभेत बोलतांना ‘मी बोलत नसून देवच माझ्या माध्यमातून बोलत आहे’, असा भाव ठेवा !

‘हिंदु जनजागृती समिती भारतात ठिकठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करते. त्यामध्ये समितीचे कार्यकर्ते हिंदु धर्मावर होणारे आघात सांगून जनप्रबोधन करत असतात. हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये बोलणारे समितीचे कार्यकर्ते साधना करतात आणि तेसुद्धा स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्नशील असतात. जशी वक्त्याची साधना असेल, त्या प्रमाणात त्याच्या वाणीमध्ये चैतन्य येऊन त्याचे भाषण प्रभावी होते. साधनेमुळे वाणी चैतन्यमय होऊन वक्त्याने सांगितलेली सूत्रे श्रोत्यांच्या मनावर बिंबतात.

पुढे एका वक्त्यांनी भावाच्या स्तरावर प्रयत्न करत सभेत बोलल्यावर त्यांना त्यांच्या बोलण्यात चांगला पालट जाणवला. पूर्वी त्यांना सभेत बोलतांना ‘स्वतःच्या बोलण्यात अहं जाणवायचा’; परंतु भावाच्या स्तरावर प्रयत्न करतांना सभेत ‘मी स्वतः बोलत नाही, तर ‘माझ्या माध्यमातून देव बोलत आहे’, असा भाव त्यांनी ठेवला. त्यानंतर त्यांना त्यांच्या बोलण्यात व्यापकता आल्याचे जाणवले. काही प्रसंगांत त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्वही जाणवले. देव किंवा ईश्वर सर्वज्ञानी असतो. वक्त्याने बौद्धिक स्तरावर कितीही प्रभावी विषय मांडण्याचा प्रयत्न केला, तरी ईश्वर श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊ शकतो आणि त्यामुळे भाव ठेवल्याप्रमाणे वक्ता श्रोत्यांच्या मनातील प्रश्नांना किंवा विचारांना चालना देणारा विषय प्रभावीपणे मांडू शकतो. परिणामी श्रोत्यांशी जवळीक होणे, त्यांना कार्यामध्ये सहभागी करून घेणे आणि स्वतःमध्ये व्यापकत्व आणणे, या गोष्टी तो सहज साध्य करू शकतो. त्यामुळे सभेत बोलतांना ‘मी बोलत नसून देवच माझ्या माध्यमातून बोलत आहे’, असा भाव ठेवा !

– एक साधक (२२.२.२०२४)