सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या सोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या चांगल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ब्रह्मोत्सवापूर्वी 

१ अ. ब्रह्मोत्सवापूर्वी साधिकेला पडलेले स्वप्न

१ अ १. अकस्मात् साधिकेच्या यजमानांची प्रकृती बिघडणे आणि तिला स्वप्नात सोनेरी नाग अर्धमूर्छित झालेला दिसल्याने भीती वाटणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या आधी काही दिवस अकस्मात् माझ्या यजमानांची प्रकृती बिघडली. त्यांच्या नाडीचे ठोके न्यून झाले होते. ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी मला एक स्वप्न पडले. त्यात ‘एक सोनेरी नाग माझ्या मागे मागे येत होता. तो अकस्मात् अर्धमूर्च्छित झाला. हे पाहून मी घाबरून त्या नागापासून दूर पळत होते.

सौ. अर्पिता देशपांडे

१ अ २. स्वप्नात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी नागावर ताटातील गुलाल आणि बुक्का वाहिल्यानंतर त्या नागाला चेतना मिळून त्याच्याकडे पाहून चांगले वाटू लागणे : अकस्मात् तेथे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि त्यांच्या समवेत काही साधक आले. तो अर्धमूर्च्छित नाग माझ्या अगदी जवळ आला. तेवढ्यात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या नागावर ताटातील गुलाल आणि बुक्का वाहिला. तेव्हा त्या नागाला चेतना मिळाली आणि त्या नागाकडे पाहून मला चांगले वाटू लागले. माझ्या मनातील त्या नागाविषयीची सर्व भीती नष्ट झाली’, असे मला दिसले.

१ आ. यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागणे आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटणे 

त्या वेळी ‘स्वप्नात श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी माझे रक्षण करून माझ्या मनातील भयही दूर केले आणि मला ज्ञान दिले’, असे मला वाटले. त्यानंतर माझ्या यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. ‘तो अर्धमूर्च्छित नाग म्हणजे, श्रीगुरूंच्या आज्ञेने आमचे सदैव रक्षण करणारा चांगला नाग आहे. अनिष्ट शक्तींच्या त्रासांशी लढत तो आमचे सावलीप्रमाणे रक्षण करतो; परंतु मला त्याचे ज्ञान नव्हते’, असे मला वाटले. या अनुभूतीनंतर मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि त्यांची सर्वज्ञताही अनुभवता आली. ‘त्यांचे सूक्ष्म अस्तित्व सदैव आमच्या समवेत आहे आणि त्यांची आमच्यावर अखंड कृपा आहे’, याची मला जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.

१ इ. ब्रह्मोत्सवाच्या आठ दिवस आधी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्वांना विश्वरूपात दर्शन देतील’, असे मला वाटत होते. 

१ ई. माझ्या मनात सतत ‘निज रूप दाखवा हो, हरि दर्शनासी या हो ।’, या भक्तीगीताच्या ओळी आठवून भावजागृती होत होती. 

१ उ. ब्रह्मोत्सवाच्या २ दिवस आधी साधिकेला खोलीसमोर ४ – ५ गरुड आनंदाने गोलाकार फिरतांना दिसणे 

ब्रह्मोत्सवाच्या २ दिवस आधी आमच्या खोलीसमोरील आकाशात ४ ते ५ गरुड आनंदाने गोलाकार फिरत होते. ते पाहून माझ्या मनाला आनंद होत होता. मी हे साधारण २ ते ३ मिनिटे अनुभवू शकले.

२. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी ‘देवीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटले. 

ब्रह्मोत्सवाच्या दिवशी साधिकेच्या असलेल्या तिन्ही गुरूंप्रतीच्या सर्वाेच्च भावामुळे तिला दुसर्‍या दिवशी पहाटे देवाने स्वप्नदृष्टांत देऊन स्वप्नात, तसेच जागेपणीही शांती, हलकेपणा आणि उत्साह अनुभवायला देणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

प्रश्न : ‘मी जे स्वप्न बघितले, ते स्वप्न नसून ‘तो दृष्टांत आहे’, असे मला वाटते, हे बरोबर आहे का ? आणि याचा अर्थ काय आहे ? कृपया याविषयी मला मार्गदर्शन करावे’, अशी तिन्ही गुरूंच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. अर्पिता बिपिन देशपांडे, सनातन आश्रम, मिरज, सांगली. (२०.५.२०२३)

उत्तर : ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी आपल्या मनात असलेला गुरूंप्रती उच्च भाव आणि ‘त्यांना बघून आपल्या जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटणे, यांमुळे तुम्हाला दुसर्‍या दिवशी पहाटे गाढ झोपेत असतांना स्वप्नदृष्टांत देऊन देवाने अनुभूती दिली. त्यामध्ये तुम्हाला ‘देवतासमान असलेले तीनही गुरु रथात बसले असून ते आपल्या दिशेने येत आहेत’, असे दिसले. या अनुभूतीमुळे तुम्ही स्वप्नात शांती अनुभवली. ही सर्वाेच्च अनुभूती आहे. त्यानंतर जागेपणीही तुम्ही शांती, हलकेपणा आणि उत्साह अनुभवला.

यावरून लक्षात येते की, आपला भाव असेल, तर देव अनुभूती देतो; म्हणून ‘भाव तेथे देव’, असे म्हणतात. या अनुभूतीनंतर ‘तुमचा तिन्ही गुरूंप्रतीचा भाव अन् श्रद्धा अधिक प्रमाणात वाढली आहे’, असे जाणवले. या अनुभूतीचा लाभ तुम्ही पुढील साधनेत अशा प्रकारे करून घ्या. तसे तुमच्याकडून होवो. ‘तुम्ही हा भाव आणि श्रद्धा पुढेही अशीच टिकवून ठेवून पुढील साधना आणखी जोमाने अन् तळमळीने करावी’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.९.२०२३)

३. ब्रह्मोत्सवानंतर 

३ अ. स्वप्नात रथोत्सवाचे दृश्य दिसणे आणि गाढ झोपेत असूनही एक विलक्षण शांतता अनुभवता येणे 

ब्रह्मोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पहाटे ३.३० ते ३.४५ या कालावधीत गाढ झोपेत असतांना मला स्वप्नात पुढील दृश्य दिसले – ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी मी जो रथोत्सव पाहिला, तोच रथ माझ्या दिशेने येत आहे. त्यात श्रीविष्णूच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ विराजमान आहेत. सभोवताली सर्वत्र उगवत्या सूर्याचा लालसर प्रकाश दिसत आहे. तो रथ आणि त्यातील देवतासमान असलेले तीनही गुरु माझ्याच दिशेने येत आहेत.’ मी गाढ झोपेत असूनही एक विलक्षण शांतता अनुभवत होते. अशी शांतता यापूर्वी मी कधीच अनुभवली नव्हती. रथ आणि त्यातील तिन्ही गुरु माझ्या दिशेने येत असतांना मला अनाहतचक्रावर चांगली स्पंदने जाणवत होती.

३ आ. झोपेतून जाग आल्यानंतर मनःस्थितीत पालट होऊन शांत वाटू लागणे आणि हलकेपणा येऊन उत्साहात वाढ होणे 

अकस्मात् मला ते दृश्य दिसायचे बंद झाले. त्या दृश्यातील शांती अनुभवल्यामुळे मला झोपेतून जाग आली आणि त्यानंतर माझ्या मनःस्थितीत पालट होऊन मला शांत वाटू लागले. माझ्या मनाला हलकेपणा येऊन माझ्या उत्साहात वाढ झाली. मला अनेकदा रात्री झोपेत विचित्र स्वप्ने पडतात आणि त्यामुळे जाग येऊन अस्वस्थता निर्माण होते. ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवसापर्यंत मला असे त्रास होत होते; परंतु ब्रह्मोत्सवाच्या रात्री मला अतिशय शांत आणि गाढ झोप लागली. ब्रह्मोत्सवानंतर रात्री मला एकही विचित्र स्वप्न पडले नाही. ब्रह्मोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पडलेल्या स्वप्नानंतर माझा तिन्ही गुरूंप्रतीचा भाव अन् श्रद्धा अधिक प्रमाणात वाढल्याचे जाणवले. मी जे स्वप्न बघितले, ते स्वप्न नसून ‘तो दृष्टांत आहे’, असे मला वाटते.’

– सौ. अर्पिता बिपिन देशपांडे, सनातन आश्रम, मिरज, सांगली. (२०.५.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक