श्री सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू समारंभ यांना अमराठींकडून विरोध करण्याचा प्रयत्न !

  • डोंबिवली येथील घटना !

  • पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) आणि गुन्हा नोंद

  • वादाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित

श्री सत्यनारायण पूजा

डोंबिवली – येथे नांदिवली परिसरातील ‘साई कमल छाया’ या इमारतीमध्ये ‘श्री सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू समारंभ’ यांच्या निमित्ताने मराठी भाषिक कुटुंबाला अमराठी लोकांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला. यावरून २७ जानेवारीच्या रात्री वाद झाला. ‘आम्हाला न विचारता समारंभाचे आयोजन कसे केले ?’ असा प्रश्‍न अमराठी सदस्याने केला, तेव्हा मराठी महिलांनी सांगितले, ‘‘हे सर्व आम्ही स्वखर्चाने करत होतो. त्यात इमारतीचा कुठलाही पैसा घेतलेला नाही.’’ या वेळी अमराठीने मराठी माणसांना शिवीगाळ, महिलांना दमदाटी करून समारंभ रोखण्याचा प्रकार केला. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात येऊन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अनिल भट आणि चिराग लालन अशी विरोध करणार्‍यांची नावे आहेत.

१. ‘साई कमल छाया’ या इमारतीमध्ये २ फेब्रुवारी या दिवशी श्री सत्यनारायण पूजा आणि हळदी-कुंकू समारंभ यांचे आयोजन केले आहे. समारंभाची माहिती इमारतीच्या सूचना फलकावर लावण्यात आली होती. अमराठी सदस्यांनी त्याचे छायाचित्र काढून इमारतीच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या गटावर प्रसारित करून तेथे अपशब्द वापरले.

२. ‘अमराठी कुटुंबियांचे हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही’, अशी चेतावणी इमारतीतील मराठी कुटुंबियांनी दिली आहे.