पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक प्रदान

पोलीस महानिरीक्षक संजय दराडे

नवी मुंबई – पूर्वी यवतमाळ येथे आणि आता कोकण परिक्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणारे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.

कोकण परिक्षेत्रात गेल्या २ वर्षांत खून, महिलांवरील अत्याचार यांसारख्या गुन्ह्यांत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिले होते. कोकणातील प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः भेटी देऊन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गदर्शन केले. महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींवर २४ घंट्यांच्या आत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २ वर्षांतील हत्या प्रकरणातील कारवायांत कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी मोठी भूमिका बजावली. वर्ष २०१७ मध्ये नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक असतांना त्यांनी उत्तरप्रदेशातून येणार्‍या ४५ बंदुका आणि ३ सहस्र काडतुसे पकडून ८ जणांची आंतरराज्य टोळी पकडली होती.