मडगाव, २७ जानेवारी (वार्ता.) – सासष्टी येथील उपप्रबंधक कार्यालयात मागील एका वर्षात आपल्या आप्तइष्टांचे जन्म आणि विवाह यांचा दाखला मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले आहेत. पोर्तुगालचे नागरिकत्व मिळवण्यासाठी जन्मदाखला आणि विवाहाचा दाखला आवश्यक असतो. यांमधील बहुतांश अर्ज हे पोर्तुगीज पारपत्र मिळण्यासाठी केलेले आहेत, अशी माहिती उपप्रबंधक कार्यालयातून देण्यात आली. ख्रिस्तीबहुल सासष्टीतील अनेक युवक गलेलठ्ठ वेतनाची नोकरी मिळवण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारण्यास इच्छुक आहेत.
सासष्टी येथील उपप्रबंधक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षी प्रमाणित जन्मदाखला मिळवण्यासाठी एकूण ३१ सहस्र ९१६ अर्ज आले, तर प्रमाणित लग्नदाखला मिळवण्यासाठी एकूण २९ सहस्र १९५ अर्ज आलेले आहेत. उपप्रबंधक कार्यालयाने ही प्रमाणपत्रे वर्ष १९१४ ते १९७० या कालावधीतील पुरातत्व कागदपत्रांच्या आधारावर दिलेली आहेत. यामधील सुमारे ७० टक्के प्रमाणित कागदपत्रे ही पोर्तुगीज पारपत्र मिळवण्यासाठी वापरली जाणार आहेत. जन्मदाखल्यामुळे गोव्यातील नागरिकांना पोर्तुगालचे नागरिकत्व मिळवणे सुलभ होत असते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जुलै २०२४ या दिवशी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना मागील एका दशकामध्ये एकूण २५ सहस्र ९३९ नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारल्याचे म्हटले होते. पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेले बहुतांश गोमंतकीय इंग्लंड येथे रहाणे पसंत करतात. इग्लंडमध्ये इंग्रजी भाषा बोलली जात असल्याने, तसेच इंग्लंडमधील स्वीनडन, दक्षिण-पश्चिम इंग्लंड आणि लंडन येथील काही भागांत गोमंतकीय नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असल्याने इंग्लंडमध्ये रहाणे अनेक जण पसंत करतात.
संपादकीय भूमिकाकुठे ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ (अर्थ : आई आणि जन्मभूमी मला स्वर्गाहूनही थोर वाटतात.) म्हणत सोन्याची लंका जिंकूनही तेथे बिभीषणाचा राज्याभिषेक करून स्वगृही परतणारे आदर्श श्रीराम आणि कुठे गलेलठ्ठ वेतनासाठी म्हणजेच पैशांसाठी मातृभूमीचाच नव्हे, तर पर्यायाने स्वसंस्कृतीचाही त्याग करणारे आताचे युवक ! |