हुमरस येथे गवारेड्यांच्या धडकेने दुचाकीस्वाराचे निधन

सावंतवाडी – तालुक्यातील कारिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा (वय ६० वर्षे) हे दुचाकीवरून कुडाळ येथे येत असतांना हुमरस उंचवळा येथे गवारेड्यांच्या कळपाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अल्मेडा यांचा जागीच मृत्यू झाला. २६ जानेवारी या दिवशी पहाटे ५.३० वाजता ही घटना घडली. घटनास्थळावरून जाणार्‍या एका व्यक्तीने या अपघाताविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात माहिती दिली. वन विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढून या समस्येपासून जनतेची मुक्तता करावी’, अशी मागणी करण्यात येत आहे. (अशी मागणी जनतेला करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)

गवारेड्यांचा कळप आरे हायस्कूलच्या परिसरात घुसला

देवगड – तालुक्यात गवारेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून गवारेड्याच्या कळपाने अनेकदा वाहनांवर आक्रमण केल्याच्या घटना घडल्या आहेत. २७ जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता गवारेड्यांचा कळप आरे हायस्कूलच्या परिसरात घुसला. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरे गावचे माजी सरपंच महेश पाटोळे यांनी तात्काळ वन विभागाच्या कार्यालयात याची माहिती दिली आणि तात्काळ गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.