रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या कु. श्रद्धा सुनील लोंढे यांची त्यांची आई आणि बहीण यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथेदिली आहेत.


सौ. सुलभा सुनील लोंढे (कु. श्रद्धा यांची आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५७ वर्षे), सातारा
१. अध्यात्मप्रसाराची तळमळ
अ. ‘वर्ष २००५ पासून कु. श्रद्धा सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागली. ती इयत्ता चौथीमध्ये असल्यापासून माझ्या समवेत सेवेला येत असे. त्या वेळी ती तिच्या बोलीभाषेमध्ये ‘गणपतीला लाल फूल का वहावे ? शंकराला अर्धी प्रदक्षिणा का घालावी ?’, यांविषयी लोकांना माहिती सांगत असे.
आ. ती इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शाळेमध्ये गुरुपौर्णिमेच्या कालावधीत प्रार्थनेच्या वेळी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत असे.
इ. ती इयत्ता नववीमध्ये असतांना आमच्या शेजारी कीर्तन करणारी एक मुलगी रहात होती. ती तिच्या समवेत मेढा या गावी कीर्तनाला गेली होती. तेव्हा तिने कीर्तनात सनातन संस्था आणि अध्यात्म यांविषयी माहिती सांगितली. त्या वेळी तिथे उपस्थित असणार्या सर्वांनी तिचे कौतुक केले.
२. इतरांना साहाय्य करण्याच्या स्वभावामुळे समाजातील लोकांचेही मन जिंकणे
ती इयत्ता चौथीमध्ये असतांना तिच्या शाळेमध्ये एक वयस्कर व्यक्ती आली होती. श्रद्धा आणि तिची मैत्रिण यांनी त्यांना पाहिले. तिने त्यांच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांना भूक लागली होती. दोघींनी स्वतःचा डबा त्यांना खाण्यास दिला. घरी येऊन माझ्याकडून कपडे धुण्याचा साबण नेऊन त्या व्यक्तीचे मळलेले कपडे धुवून दिले. त्या व्यक्तीने जातांना श्रद्धाला खाऊसाठी पैसे दिले होते. त्याच पैशांचा तिने त्यांना बिस्कीटचा पुडा घेऊन दिला आणि त्यांना बसस्थानकावर पोचवले. ती व्यक्ती एक वर्षानंतर ‘श्रद्धा लोंढे कुठे आहे ?’, याची चौकशी करत शाळेत आली होती. तेव्हा श्रद्धाने ती शाळा सोडली होती. त्यामुळे त्या व्यक्तीने शाळेतील शिक्षकांना विचारून प्रार्थनेच्या वेळी श्रद्धाविषयी घडलेला पूर्वीचा प्रसंग सर्वांसमोर सांगितला. ‘तिच्यातील संस्कारांमुळेच ती हे करू शकली’, असेही ती व्यक्ती म्हणाली. तेव्हा शिक्षकांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू आले. समाजातील व्यक्तींवर ती जसे निरपेक्ष प्रेम करते, तसे प्रेम ती घरातील सर्वांवर करते. त्यामुळे ती सर्वांना हवीहवीशी वाटते. समाजातील अन्य व्यक्तीही सांगतात, ‘तिच्यामध्ये इतरांपेक्षा वेगळेपण जाणवते.’
३. श्रद्धा हिला साधनेला विरोध करणार्या नातेवाइकांमध्ये पालट होणे !
श्रद्धा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागली. तेव्हा काही नातेवाइकांना ते पटले नाही. नातेवाइक तिला म्हणायचे, ‘‘तू एवढी हुशार मुलगी आहेस. पुढे चांगली नोकरी करशील. असे असतांना तू हा निर्णय का घेतेस ?’’ तेव्हा ती ठामपणे सर्वांना सांगत असे, ‘‘विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे !’’ ‘वेळ आल्यानंतर गुरुदेव त्यांच्यामध्ये पालट करतील’, असे तिला वाटत होते आणि काही वर्षांनंतर सर्व नातेवाइकांमध्ये पालट झाला. आता सर्वजण सनातन संस्थेशी जोडले आहेत. ते सर्व जण श्रद्धाला भ्रमणभाष करून तिची विचारपूस करतात.
४. प्रेमभाव
रामनाथी आश्रमात आमच्याकडून कुणी जाणार असेल, तेव्हा ती तिच्या विभागातील किंवा खोलीतील मैत्रिणींना सांगते, ‘माझ्या घरून खाऊ येणार आहे.’ प्रत्येकाला त्यांच्या आवडीचा खाऊ मिळावा, यासाठी खाऊची सूची मला पाठवते. त्यानुसार मी सर्वांचा खाऊ रामनाथी आश्रमात पाठवते. तिच्यामुळे माझीही सेवा होते.
५. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे
मला एखाद्या प्रसंगामध्ये ताण आल्यावर मी श्रद्धाशी बोलते. त्या प्रसंगात ती मला योग्य दृष्टीकोन देऊन स्वयंसूचना सिद्ध करून देते. त्यामुळे मला त्या प्रसंगांत योग्य कृती करण्याससाहाय्य होते.

सौ. स्वप्ना विनोद चव्हाण (कु. श्रद्धाची मोठी बहीण), सातारा
१. आधार वाटणे
‘श्रद्धा माझ्यापेक्षा लहान आहे; परंतु मला काही आध्यात्मिक किंवा वैयक्तिक अडचणी येतात, त्या वेळी मी तिलाच संपर्क करते. तिच्याकडून मला योग्य दृष्टीकोन मिळतात. तिच्याशी बोलल्यावर मला पुष्कळ हलके वाटते आणि ताणही निघून जातो, तसेच सकारात्मकताही वाढते.’
परम पूज्य गुरुदेव, तुमच्याच कृपेमुळे आम्हाला श्रद्धाविषयी लिहिण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आम्ही आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १८.३.२०२४)