वर्ष २००३ ते २००७ या कालावधीत एका संतांना वाईट शक्तीचा त्रास होऊन त्यांच्यावर आवरण येणे, काही वेळा असंबद्ध बोलणे, शारीरिक त्रासात वाढ होणे, प्राणशक्ती न्यून झाल्याने पुष्कळ थकवा येणे किंवा कधीतरी काहीच न बोलणे अशा प्रकारचे त्रास होत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही वेळा संतांशी प्रत्यक्ष बोलून आणि नंतर त्यांच्याशी वेळोवेळी दूरभाषवर बोलून त्यांना प्रेमाने समजावून सांगितले, तर काही वेळा कुटुंबियांकडे निरोप देऊन किंवा अन्य साधकांना नामजपादी उपाय करायला सांगून त्यांच्या त्रासाची तीव्रता न्यून केली. त्या संदर्भातील सूत्रे येथे दिली आहेत.
२७ जानेवारी या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/877978.html

३ ई. पुण्याहून संतांचे नातेवाईक संतांना भेटायला येणार असल्याचे समजणे आणि ‘प.पू. डॉक्टरांनी संतांसाठी रामनाथी आश्रमातून नामजपादी उपाय करतो’, असे सांगितल्यावर साधिकेला आलेला ताण दूर होणे : वर्ष २००४ मे मध्ये एक दिवस संत त्यांच्या त्रास असणार्या नातेवाइकाच्या समवेत भ्रमणभाषवर १० मिनिटे बोलत होते. तेव्हा त्यांच्यावर पुष्कळ आवरण आले. त्यानंतर ते दिवसभर असंबद्ध बोलत होते. त्याच दिवशी संतांच्या पुण्यातील नातेवाइकांचा त्यांची सेवा करणार्या साधिकेला दूरभाष आला. आम्ही उद्या संतांना भेटायला येतो. त्या वेळी सेवा करणार्या साधिकेला ताण आला. आता कसे करायचे ? संत तर पुष्कळ काहीतरीच बोलत आहेत. मी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘ते नातेवाइक पुण्याहून साधारण कधी निघणार ? आणि त्या संतांना भेटायला किती वाजता येणार ? काही काळजी करू नका. मी इथून नामजपादी उपाय करतो. त्या नातेवाइकांना संतांना भेटायला येऊ दे.’’ त्यामुळे माझी काळजी दूर झाली.
प्रत्यक्षात दुसर्या दिवशी त्या संतांना त्यांचे नातेवाईक भेटायला येण्यापूर्वी १ घंटा आधी ते संत शांत झाले. त्यानंतर ते नातेवाईक आल्यावर ते संत नेहमीप्रमाणे त्यांच्याशी पुष्कळ चांगले बोलले. त्यांना काही घंट्यांपूर्वी इतका आध्यात्मिक त्रास होत होता. हे मला खरेच वाटत नव्हते. केवळ प.पू. डॉक्टरांनी नामजपादी उपाय केल्यामुळेच हे शक्य झाले.
३ उ. आध्यात्मिक त्रास असणार्या नातेवाइकाचा संतांना भ्रमणभाष आल्यावर संतांना अस्वस्थता वाटून ते अधिक काळ झोपणे आणि झोप झाल्यावरही थकल्याप्रमाणे दिसणे अन् प.पू. डॉक्टरांनी नामजपादी उपाय केल्यावर त्रासाचे प्रमाण न्यून होणे : त्यानंतर जेव्हा त्या आध्यात्मिक त्रास असणार्या नातेवाइकाचा संतांना भ्रमणभाष यायचा, तेव्हा त्या संतांवर आवरण येऊन ते अस्वस्थ होत असत आणि त्यांना अधिक वेळ झोप लागत असे; परंतु झोप झाल्यावरही त्यांची स्थिती थकल्याप्रमाणे दिसत असे. एकदा असे २ – ३ दिवस झाल्यावर प.पू. डॉक्टरांनी नामजपादी उपाय केल्यावर त्रासाचे प्रमाण न्यून झाले.
४. संतांनी देहत्याग करण्यापूर्वी त्यांना झालेले त्रास आणि निरपेक्ष प्रीतीने त्यांची काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
४ अ. देहत्यागापूर्वी चार दिवस आधी संतांना चित्रविचित्र चेहरे दिसत असल्याने त्यांना नामजप करणे अशक्य होणे, प.पू. डॉक्टरांनी दूरभाषवर संतांशी बोलून संतांना लढण्यास शिकवणे आणि त्यांच्या आवाजातील चैतन्यामुळे संतांना लढण्यासाठी बळ मिळणे : त्या संतांच्या देहत्यागापूर्वी चार दिवस सतत त्यांना कुणीतरी ‘तुला आम्ही पांढरी चादर घालणार’, असे सांगत होते. त्या वेळी त्या संतांना चित्रविचित्र चेहरे सतत दिसत होते आणि ते चेहरे सांगत होते, ‘आम्हीच तुला नेणार. त्या संतांना त्या चेहर्यांची पुष्कळ भीती वाटत होती. ते चित्रविचित्र चेहरे सतत त्या संतांच्या सभोवती फिरत होते. त्यामुळे त्या संतांना नामजप करता येत नव्हता. ते संत सतत ‘नको, नको आणि काही वेळा ‘नाही, नाही’, असे जोरात म्हणत होते. हे सर्व प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी त्या संतांशी बोलतो.’’ प.पू. डॉक्टर दूरभाषवर बोलत असतांना मी दूरभाषचा (रिसिव्हर) त्या संतांच्या कानाजवळ ठेवला. प.पू. डॉक्टर त्या संतांना सांगत होते, ‘‘आता तुम्हाला त्रास देणार्या हडळ आणि चेटकीण आहेत. त्यांना घाबरू नका. तुमचा नामजप केलेला देह आपल्याला त्या वाईट शक्तींच्या हातात द्यायचा नाही. नाहीतर ‘तुम्ही हरलात’, असे होईल. तुम्हाला जिंकायचे आहे. त्यामुळे तुम्ही लढा.’’
४ आ. प.पू. डॉक्टरांनी त्या संतांना धीर देऊन अगदी प्रेमाने त्यांच्याकडून प्रत्येक शब्द उच्चारून नामजप करून घेणे आणि हळूहळू ते संतही नामजप करू लागणे आणि काही वेळाने त्यांना दिसणारे चित्रविचित्र चेहरे दिसणे बंद होऊन संतांना शांत झोप लागणे : त्या वेळी संतांना नामजप करतांना त्रास होत होता. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी त्यांच्याकडून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, असा नामजप करून घेतला. ते प्रेमाने त्या संतांना सांगत होते, म्हणा ‘ॐ’ त्यानंतर ते संत ‘ॐ’ म्हणत होते. आता ‘नमो’ त्यानंतर ते संत ‘नमो’ म्हणत होते’. याप्रमाणे प्रत्येक शब्द त्यांनी त्या संतांकडून उच्चारून घेतला. मग हळूहळू ते संत नामजप करू लागले. असे अखंड प.पू. डॉक्टर दीड घंटा त्या संतांशी लढण्यासंदर्भात बोलत होते. त्यामुळे त्या संतांना शक्ती मिळाली. काही वेळाने ते संत शांत झाले. त्यांची सेवा करणार्या साधिकेने त्यांना विचारले, ‘‘आता कोणते चित्रविचित्र चेहरे तुम्हाला दिसत आहेत का ?’’ त्यावर ते ‘नाही’ म्हणाले. नंतर त्यांना शांत झोप लागली. संत साडेतीन वर्षे सतत अंथरुणावर असूनही प.पू. डॉक्टर प्रत्येक वेळी त्यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासाशी लढण्यासाठी शक्ती देत होते.
अशा प्रकारे अनेक प्रसंगांत प.पू. डॉक्टरांनी प्रारंभी प्रत्यक्ष उपाय करून आणि नंतर ते संत घरी गेल्यावर अप्रत्यक्ष उपाय करून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली.
‘हे गुरुदेवा, त्या कालावधीत मला आपली प्रीती अखंड अनुभवता आली. तेव्हा संतसेवा म्हणजे काय ? ती गुरुसेवा म्हणून कशी करायची हेही मला ठाऊक नव्हते. ‘संतांना होणार्या एवढ्या त्रासात शांत कसे रहायचे ? सर्व अडचणींना सामोरे कसे जायचे ? आध्यात्मिक त्रासात कसे लढायचे ? संतसेवा करतांना कोणता दृष्टीकोन ठेवायचा ? प्रत्येक प्रसंग स्थिर राहून कसा हाताळायचा ? अशा अनेक गोष्टी आपणच मला शिकवल्यात. त्या संतांसमवेत मलाही सतत आपण प्रत्यक्ष बोलण्याच्या किंवा प्रसादाच्या माध्यमातून, तसेच काही वेळा निरोप पाठवून संतसेवेसाठी बळ दिले आणि माझ्याकडून संतसेवा करून घेतलीत; अन्यथा हे सर्व मला करणे अशक्यच होते. वरील सर्व दृश्ये डोळ्यांसमोर येऊन आपल्याच कृपेमुळे सर्व सूत्रे लिहिता आली आणि माझी भावजागृती झाली. आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(समाप्त)
– संतांची सेवा करणारी साधिका (१६.४.२०२४)
|