‘Mobile Forensic Van’ Launched In Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे लोकार्पण !

  • १०० टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळी काढता येणार !

  • सबळ पुराव्यांमुळे आरोपी सुटणार नाहीत !

देशात महाराष्ट्र राज्यातच प्रथम मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पणप्रसंगी हिरवा झेंडा दाखवितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ जानेवारी या दिवशी मुंबईत ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे लोकार्पण करण्यात आले. ‘अनेक खटल्यांमध्ये योग्य पुराव्यांअभावी आरोपी सुटतात; पण आता तसे होणार नाही. या व्हॅनच्या माध्यमातून १०० टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळीच काढता येईल’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ‘अशा २५६ व्हॅन्स आम्ही सिद्ध करणार आहोत. सध्या २१ व्हॅन्स चालू केल्या आहेत’, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले…,

१. देशात महाराष्ट्र राज्यातच प्रथम मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सिद्ध केल्या आहेत. त्यात विविध प्रकारचे साहित्य असेल. तिथे वैज्ञानिक विश्‍लेषक (साइंटिफिक अ‍ॅनालिस्ट) आणि रासायनिक विश्‍लेषक (केमिकल अ‍ॅनालिस्ट) हे उपलब्ध असतील. त्यांच्याकडे ‘फॉरेन्सिक एक्स्पर्ट’चा दर्जा असायला हवा आणि त्याचे प्रमाणपत्रही हवे.

२. गुन्हा झालेल्या ठिकाणी तेथील पुरावे जमा करून रक्ताचे नमुने, नार्कोटिक नमुने किंवा एखाद्या स्फोटाचे नमुने गोळा केले जातील.

३. प्रत्येक नमुन्याची जागेवरच चाचणी होईल, याचे ‘किट’ही त्यात उपलब्ध आहे. यातून मिळालेले विविध पुरावे संरक्षित करण्यासाठी ‘ब्लॉकचेन’ची पद्धत सिद्ध केली आहे. यामुळे कुणालाही त्या पुराव्यांची छेडछाड करता येणार नाही. अतिशय सबळ आणि वैज्ञानिक पुरावा उपलब्ध असेल.

४. या सर्व व्हॅन्समध्ये सी.सी.टी.व्ही., तसेच शीतकपाटही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

५. सगळे पुरावे योग्य प्रकारे ‘सील’ होतात का, यावर कॅमेर्‍यातून लक्ष ठेवता येणार आहे.

६. या माध्यमातून गुन्हे उघडकीस येणे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणे, यात गुणात्मक पालट झाल्याचे आपल्याला पहायला मिळेल.