श्री. सागर गरुड, प्रतिनिधी, प्रयागराज

प्रयागराज, २७ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभपर्वात येणार्या कोट्यवधी भाविकांना आजारावर उपचार मिळावेत, यासाठी १० आयुर्वेद चिकित्सालय उभारण्यात आले आहेत. प्रत्येक चिकित्सालयात ३ वैद्यांसह अन्य ६ कर्मचारी कार्यरत आहेत. एका चिकित्सायलयात प्रतिदिन ८०० हून अधिक रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात येत आहेत. येथील एका आयुर्वेद चिकित्सालयाला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी भेट देऊन तेथील वैद्य मनोजकुमार सिंह यांच्याशी संवाद साधला.
वैद्य मनोजकुमार सिंह म्हणाले,
१. या चिकित्सालयात सर्वप्रकारच्या आजारांवरील उच्चप्रतीची औषधे उपलब्ध आहेत.
२. अपचन, पीत्ताचे विकार, संधिवात यांसारख्या विविध प्रकारचे रुग्ण आमच्याकडे दु:खी होऊन येतात आणि समाधानी होऊन जातात.
३. महाकुंभमेळ्यात चालल्याने अनेक वयस्करांना संधिवाताचा त्रास होऊ लागतो. अशा रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
४. चिकित्सालयासमवेत येथे योग शिबिरही उभारले आहे. योगाद्वारे निरोगी रहाण्याविषयी येथे मार्गदर्शन केले जाते.
५. सरकारी चिकित्सालय असल्याने सर्व रुग्णांना नि:शुल्क उपचार आणि औषधे यांचे वितरण केले जाते.