गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री

स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई

पणजी – गोवा मुक्तीलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई (वय १०० वर्षे) यांना केंद्र सरकारने प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार घोषित केला आहे. ही घटना गोवा राज्यासाठी गौरवास्पद ठरली आहे. गोवा मुक्तीलढ्यात त्यांनी मोठी भूमिका निभावली असून धैर्य आणि दृढनिश्चय यांचे प्रतीक म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांचा जन्म पोर्तुगीज राजवटीत मे १९२४ मध्ये झाला. वर्ष १९५५ मध्ये म्हणजे वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांनी भूमीगत रेडिओ स्टेशन चालू केले आणि त्याद्वारे त्या भारतीय सैन्याला पारेषण केंद्रे उभारण्यास साहाय्य करून मुक्तीलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. विद्यार्थी दशेत त्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक टी.बी. कुन्हा (त्रिस्ता ब्रागांझ कुन्हा) यांच्या ‘गोअन युथ लीग’च्या सक्रीय सदस्य होत्या आणि २ वर्षे त्या सचिव पदावर कार्यरत होत्या.

मुख्यमंत्री सावंत, खासदार तानावडे यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर यांच्याकडून अभिनंदन !

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर यांनी स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई या भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. गोव्यासाठी त्या भूषणावह व्यक्तीमत्त्व आहेत.’’