‘मकोका’ आणि ‘एम्.पी.डी.ए.’अंतर्गत गुन्हेगारांवर झाली होती कारवाई
१ सहस्रहून अधिक गुन्हेगार जामिनावर बाहेर
पुणे – विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई केलेले १ सहस्र गुन्हेगार जामिनावर बाहेर आले आहेत. त्यामध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर न्यायालयाकडून जामीन मिळवून ७२३ गुन्हेगार आणि ‘झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एम्.पी.डी.ए.) कारवाई केलेले २८५ गुन्हेगार कारागृहातील स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण करून बाहेर पडले आहेत. आता त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या समोर निर्माण झाले आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, तसेच समाजामध्ये दहशत निर्माण करणारे गुंड, गुन्हेगार टोळ्यांचे प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पुणे पोलिसांनी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहामध्ये बंदिस्त केले होते; पण त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळवून बाहेर आलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वेळप्रसंगी त्यांची चौकशी केली जाते. त्यांच्या हालचाली, रहाण्याच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाते.