मुंबई – गरीब गरजू रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष अद्ययावत् करण्यात येणार आहे. कक्षाचा कारभार ‘पेपरलेस’ होणार आहे. वैद्यकीय साहाय्यासाठी आता ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यात येणार असून स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
१. रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली एकत्रित जोडण्यात येणार आहेत.
२. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा ‘एओ’ क्रमांक आणि ‘एम्’ क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतीशील आणि सोपी होणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
३. संबंधित जिल्ह्यातील मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षास प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यःस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे आणि समस्यांचे निराकरण करणे, कक्षामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यास साहाय्य करणे, मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून आर्थिक साहाय्य झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाविषयी जनजागृती आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाच्या वतीने अर्थसाहाय्य देण्यासाठी आजारांचे पुनर्विलोकन करणे आणि अर्थसाहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे यांसाठी राज्यातील तज्ञ आधुनिक डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.