Miscreant sadhus At KumbhMela : कुंभमेळ्यात साहित्याची मागणी करत भोंदू साधू करत आहेत भाविकांची फसवणूक !

प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यात ठिकठिकाणी भोंदू साधू रस्त्यावरून चालणार्‍या भाविकांना थांबवून त्यांच्याकडे चप्पल, स्वेटर, ब्लँकेट आदी साहित्य मागत आहेत. हे साहित्य मागतांना ‘मला पैसे नको’, असे म्हणून हे भोंदू वरीलप्रकारे साहित्याची मागणी करतात. त्यांना आवश्यकता असेल, असे समजून अनेक जण त्यांना ते साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे देतात; मात्र पैसे मिळाल्यावर पुन्हा हे भोंदू साधून अन्य मार्गावर जाऊन येणा-जाणार्‍यांकडे पैशांची मागणी करतात. अशा प्रकारे साधूंचा वेश धारण करून साहित्याची मागणी करून पैसे स्वीकारणार्‍या भोंदूंची संख्या कुंभमेळ्यात वाढत आहे.

कुंभमेळ्यामध्ये काही अमूल दूधाच्या विक्रीची दुकाने आहेत. काही साधू या दुकानांच्या बाहेर उभे राहून दूध खरेदी करण्यासाठी येणार्‍यांकडे दुधाची मागणी करतात. अनेक भाविक त्यांना अर्ध्या लिटरच्या ३-४ पिशव्या विकत घेऊन त्यांना सहजपणे देतात; मात्र तेच भोंदू साधू थोड्या वेळ्याने पुन्हा येऊन अन्य ग्राहकांकडे दुधाची मागणी करतात. अशा प्रकारे दिवसभर वेगवेगळ्या भाविकांडून हे भोंदू दुधाच्या अनेक पिशव्या घेतात. या भोंदू साधूंचा हा नियमितचा धंदा झाला आहे.