
प्रयागराज – येथील महाकुंभमेळा परिसरात संत आणि साधू यांनी प्रजासत्ताकदिन साजरा केला. आखाड्यांसह सर्व साधू-संतांच्या शिबिरात तिरंगा फडकवण्यात आला. आखाड्यांमध्ये धार्मिक ध्वजाच्या शेजारी भारतीय तिरंगा फडकवण्यात आला. सर्वांनी मिळून राष्ट्रगीतही गायले. श्री पंच दशनम जुना आखाड्याचे जगद्गुरु गर्गाचार्य मुचकुंद पीठाधीश्वर स्वामी महेंद्रानंद गिरी महाराज आणि महामंडलेश्वर स्वामी जयंबा नंद गिरि जुनागड यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाल्यानंतर शेकडो संतांनी हातात तिरंगा घेऊन मिरवणूक काढली. सर्व जण ‘वन्दे भारत’च्या घोषण देत होते. या वेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेकडूनही महाकुंभक्षेत्रात ध्वजारोहण करण्यात आले. आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले. यासह उत्तरप्रदेश राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मिर्झापूर येथील मुन्नी देवी या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी ब्रिगेडिअर यु.एस्. कंडील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.