Mahakumbh Jan Aushadhi Kendra : नागरिकांनी सरकारच्या जनऔषधि केंद्रांमधून औषधे खरेदी केल्यास ५० ते ९० टक्क्यांपर्यंत बचत !

‘फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी दधीच  यांची माहिती

जनऔषधी केंद्रांवर उपलब्ध असलेले औषध दाखवतांना रवी दधीच

प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – नागरिकांनी सरकारच्या जनऔषधी केंद्रांमधून औषधे खरेदी केल्यास ५० ते ९० टक्क्यांपर्यंत बचत होईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या ‘फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया’चे (‘पी.एम्.बी.आय’चे) मुख्य कार्यकारी अधिकारी रवि दधीच यांनी दिली. रवि दधीच यांनी सेक्टर ७ मधील कलाग्राममधील जनऔषधी स्टॉल आणि अन्य केंद्रे यांची पाहणी केली, तसेच केंद्रांचे व्यवस्थापक आणि उपस्थित नागरिक यांच्याशी चर्चा केली. यानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते.
दधीच पुढे म्हणाले, ‘‘कुंभक्षेत्री आम्ही ५ जनऔषधी केंद्रे स्थापन केली आहेत. ही केंद्रे संपूर्ण कुंभपर्वाच्या कालावधीत कार्यरत रहातील. याचा उद्देश अल्प किमतीत आणि दर्जेदार औषधांची माहिती देणे अन् ती उपलब्ध करून देणे, हा आहे. सध्या उत्तरप्रदेशात २ सहस्र ६३३ जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत, तर प्रयागराजमध्ये अशा ६२ केंद्रांचा समावेश आहे. देशभरात जनऔषधी योजनेच्या अंतर्गत १५ सहस्रांहून अधिक केंद्रे उघडण्यात आली असून २५ सहस्र केंद्रे स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे. या वर्षी या केंद्रांंद्वारे २ सहस्र कोटी रुपयांच्या औषधांची विक्री करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १ सहस्र ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’’

एका क्लिकवर कळणार आपल्या परिसरातील जनऔषधी केंद्राचा पत्ता !

दधीच पुढे म्हणाले, ‘‘महाकुंभपर्वात आलेल्या भाविकांना केवळ एका क्लिकवर पिनकोड आधारित प्रणालीच्या माध्यमातून त्यांच्या जवळच्या जनऔषधि केंद्राचा पत्ता सांगितला जात आहे. नागरिक स्वतःही ही माहिती ‘पी.एम्.बी.आय’च्या अधिककृत संकेतस्थमळावर शोधू शकतात.’’

याप्रसंगी ‘पी.एम्.बी.आय’चे व्यवस्थापक गौतम कपूर, साहायक व्यवस्थापक नितीन सिंह, नोडल अधिकारी मानवेंद्र सिंह चौहान, केंद्र संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.