केंद्रीय चिकित्सालयाकडून आतापर्यंत २ लाख लोकांची पडताळणी ! – डॉ. मनोज कौशिक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक

डॉ. मनोज कौशिक

प्रयागराज, २३ जानेवारी (वार्ता.) – प्रयागराज कुंभनगरीतील केंद्रीय चिकित्सालयात आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयात  एकूण १ सहस्र २०० हून अधिक रुग्ण भरती झाले होते. आतापर्यंत एकूण सामान्य शस्त्रकर्म ७५०, ‘आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत ४२ शस्त्रकर्मे झाली. हृदयरोगाचे ६८ हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय चिकित्सालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज कौशिक यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. या रुग्णालयात अनेक साधूंनीही उपचार घेतले असून त्यांना उपचारानंतर त्यांच्या मंडपात पाठवण्यात आले आहे.

मौनी अमावास्येच्या सिद्धतेविषयी डॉ. कौशिक पुढे म्हणाले की, या निमित्ताने २-२ डॉक्टरांचा एक चमू २४ घंटे कार्यरत असणार आहे. कोणत्याही डॉक्टरला सुटी देण्यात येणार नाही. सर्व तज्ञ डॉक्टर येथेच कार्यरत असतील. आमच्याकडून एखाद्या डॉक्टरला काही कारणांसाठी सुटी घोषित केल्यावरच ते मुख्यालय सोडू शकतात.