भाविकांसाठी १५० हून अधिक विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन ! – हिमांशू बडोनी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, प्रयागराज

मौनी अनावस्येच्या दिवशी १० कोटी भाविक येण्याची शक्यता !

प्रयागराज,२४ जानेवारी (वार्ता.) – येथील कुंभक्षेत्रात २९ जानेवारी म्हणजे मौनी अमावास्येच्या दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता १५० हून अधिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. या दिवशी ८ ते १० कोटी भाविक येण्याची शक्यता असल्याने मौनी अमावास्येचे मोठे आव्हान भारतीय रेल्वे प्रशासनासमोर आहे. रेल्वे प्रशासनाने भाविकांसाठी १५० हून अधिक विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रबंधक श्री. हिमांशू बडोनी यांनी २४ जानेवारी या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

हिमांशू बडोनी

श्री. हिमांशू बडोनी पुढे म्हणाले, ‘‘प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन रेल्वेस्थानकावर येणार्‍या भाविकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोचवण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन सज्ज आहे. आम्ही आतापर्यंत मकर संक्रातीच्या दिवशी १३२ रेल्वे सोडून एक उच्चांक गाठला होता. या वेळी १५० रेल्वेगाड्या सोडण्याचा प्रयत्न आहे.  रेल्वेस्थानकांजवळ आश्रयस्थळांमध्ये आश्रय घेणार्‍या भाविकांसाठी ‘इस्कॉन संस्थे’च्या वतीने खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

२८ ते ३१ जानेवारी या कालावधीत मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेतून प्रवास करतील. भाविकांचा विचार करून काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या रहित केल्या आहेत, तर काही रेल्वेगाड्या अन्य मार्गाने वळवल्या आहेत. प्रवाशांसाठी रहाण्याची व्यवस्था प्रयागराज येथील खुसरो बाग येथे केली आहे. तेथे ५० सहस्र ते १ लाख श्रद्धाळू एकत्र थांबू शकतील, एवढी त्याची क्षमता आहे. आम्ही सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. महाराष्ट्रातून ५२, कर्नाटक ६ आणि गोवा येथून ४ रेल्वे गाड्या सोडण्यात येतील. त्यातील काही रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील भाविकांनी अधिकाअधिक संख्येने कुंभक्षेत्री यावे, असे आवाहन श्री. हिमांशू बडोनी यांनी केले.