Prayagraj Kumbh Parva 2025 : भाविक ज्या सेक्टरमध्ये स्नान करतील, तेथूनच त्यांना गंतव्यस्थळी पाठवणार !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

मौनी अमावास्येच्या दिवशी प्रयागराजमधील ‘संगम नोज’वर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – मौनी अमावास्येच्या दिवशी महाकुंभपर्वातील दुसरे आणि सर्वांत मोठे अमृत स्नान असल्याने त्या दिवशी १० कोटी भाविक स्नानासाठी येण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस अन् प्रशासन यांनी कंबर कसली आहे. त्रिवेणी संगमाचे ठिकाण असलेल्या ‘संगम नोज’वर भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने ही गर्दी टाळण्यासाठी भाविक ज्या सेक्टरमध्ये स्नान करतील, तेथूनच त्यांना स्नानानंतर गंतव्यस्थळी पाठवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाकुंभक्षेत्री २५ सेक्टर्स असून भाविकांच्या सोयीसाठी १२ कि.मी. लांब घाट सिद्ध करण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी नदीत भरपूर पाणी सोडण्यात आले आहे.

भाविक ज्या सेक्टरमध्ये स्नान करतील, तेथूनच त्यांना परत पाठवले जावे आणि कुठल्याही परिस्थितीत २७ ते २९ जानेवारी या कालावधीत त्यांना संगम नोजकडे किंवा अन्य ठिकाणी जाऊ देऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने सर्व पोलीस आणि सेक्टरप्रमुखांना दिल्या आहेत. भाविकांना सोयीस्कर आणि सुगम स्नानाची सुविधा उपलब्ध करून देणे, हे आमचे प्राधान्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाच्या निर्देशांनुसार भाविकांच्या सोयीसाठी १२ कि.मी. लांब घाटाची निर्मिती करण्यात आली आहे. घाटांवर गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र पथके निर्माण करण्यात आली आहेत. यासह घाटांवरील पायाभूत सुविधा अधिक सक्षम केल्या जातील. बॅरिकेडिंग, जल पोलीस, वॉच टॉवर, लाईटिंग, साइनेज, शौचालय, चेंजिंग रूम, स्वच्छता आदी व्यवस्थाही निश्‍चित केल्या जातील.