बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे प्रकरण
कणकवली – कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी कणकवली एस्.टी. बसस्थानकासमोरील ‘लक्ष्मी लॉज’चा मालक संजय सुरेश सांडव यांना २३ जानेवारीला येथील न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१५ जानेवारीला कणकवली शहरात २ बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी २३ जानेवारीला संपला. त्यामुळे पोलिसांनी दोघींना न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायालयाने दोघींना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात शहरातील एका लॉजमध्ये त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ‘लक्ष्मी लॉज’चे व्यवस्थापक ओंकार विजय भावे यांना पोलिसांनी २२ जानेवारीला अटक केली होती, तर या लॉजचे मालक सांडव यांना २३ जानेवारीला अटक करण्यात आली.