मालवण तहसीलदारांसाठी असलेल्या बंगल्याच्या भूमीत अतिक्रमण

अतिक्रमण तातडीने हटवण्याचे तहसीलदारांचा आदेश

मालवण – मालवण तहसीलदारांसाठी असलेल्या बंगल्याच्या भूमीत अतिक्रमण करण्यात आल्याचे समजल्यानंतर तहसीलदार वर्षा झालटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महसूल, पोलीस, नगरपालिका, बांधकाम, मद्यबंदी विभाग आणि भूमी अभिलेख अशा सर्व विभागांच्या प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत तातडीने भूमीची मोजणी करून तात्काळ अतिक्रमण हटवावे, असा आदेश झालटे यांनी संबंधित विभागांना दिला.

शहरातील एस्.टी. बस आगाराच्या परिसरात तहसीलदारांना रहाण्यासाठी बांधकाम विभागाकडून अनेक वर्षांपूर्वी एक बंगला बांधण्यात येत होता; मात्र बांधकाम अपूर्ण स्थितीत असल्याने ती इमारत आता पूर्णपणे खराब झालेली आहे. या बंगल्याकडे जाण्यासाठी प्रशस्त मार्ग नाही. याचा लाभ घेत या बंगल्याच्या भूमीत अतिक्रमण करण्यात आले. याविषयी तहसीलदार झालटे यांना समजल्यावर त्यांनी परिसराची पहाणी केली आणि संपूर्ण जागेभोवती संरक्षक भिंत (कंपाऊड वॉल) उभारण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले. संबंधित व्यक्तीला अतिक्रमण हटवण्याची नोटीस देण्यात आली असून त्यांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्यास महसूल प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ‘शासकीय भूमीत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही’, असे तहसीलदार झालटे यांनी या वेळी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम ! शासकीय भूमीत अतिक्रमण होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !