पणजी, २३ जानेवारी (वार्ता.) – गोव्यातील ‘श्वेत कपिला’ या गायीच्या जातीला ‘आय.सी.ए.आर्.’ने (‘नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस’ने) राष्ट्रीय मान्यता दिली आहे. राष्ट्रीय मान्यता मिळणारी ‘श्वेत कपिला’ ही गोव्याची पहिली गायीची जात ठरली आहे.
‘श्वेत कपिला’ या जातीची गाय ही गोव्यातील आव्हानात्मक हवामानाशी, म्हणजेच अधिक पाऊस, तसेच उष्ण आणि दमट परिस्थितीचा सामना करण्यासाठी ओळखली जाते. अधिकृत मान्यता नसल्याने या जातीला पूर्वी ‘नॉन-डिस्क्रिप्ट’ (वर्णन करण्यास अवघड असलेली) म्हणून वर्गीकरण करण्यात आले होते. ‘आय.सी.ए.आर्.’च्या जात नोंदणी गोवा समितीच्या अथक प्रयत्नानंतर ‘श्वेत कपिला’ गायीच्या जातीला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे, तसेच तिला भारताच्या समृद्ध कृषी जैवविविधतेचा भाग म्हणून वेगळी ओळखही मिळाली आहे. प्रमाणपत्र प्रदान समारंभ नवीन देहली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ‘आय.सी.ए.आर् – के.व्ही.के.’ आणि ‘आय.सी.ए.आर्.- सी.सी.ए.आर्.आय.’ यांचे अधिकारी, तसेच गोव्यातील प्राणी विज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ उधरवार संजयकुमार यांची उपस्थिती होती. या वेळी ‘श्वेत कपिला’ या गायीला राष्ट्रीय मान्यता नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना शास्त्रज्ञ उधरवार संजयकुमार म्हणाले,‘‘श्वेत कपिला’ गायीला मान्यता मिळाल्याने नैसर्गिक शेतीला चालना मिळणार आहे. राज्यातील लहान शेतकरी अल्प खर्चात या गायीची सहजपणे देखभाल करू शकतात’’.
‘श्वेत कपिला’ गायीचे वैशिष्ट्य
‘श्वेत कपिला’ गायीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा आकर्षक पांढरा रंग. तिला तोंडापासून शेपटीच्या टोकापर्यंत पांढरा रंग असतो. यामध्ये पांढर्या पापण्या आणि मुख यांचाही समावेश आहे. या जातीच्या गायी लहान आणि मध्यम उंचीच्या असतात. दुग्धोत्पादनाच्या संबंधी ‘श्वेत कपिला’ ही जात मध्यम उत्पादनासाठी ओळखली जाते. या गायीचे प्रतिदिन दूध उत्पादन १.८ ते ३.४ लिटर असते. या गायीची उंची ९७ ते १३७ सें.मी.पर्यंत असते. सध्या या गायींची संख्या सुमारे २२ सहस्र आहे. केंद्र सरकारच्या प्रमुख ‘मिशन झिरो नॉन-डिस्क्रिप्ट’ या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतातील मूळ प्राण्यांच्या अनुवांशिक संसाधनांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे आहे. राष्ट्रीय प्राणी अनुवांशिक संसाधन डेटाबेसमध्ये ‘श्वेत कपिला’ जातीचा समावेश केल्यामुळे या जातीच्या गायीला एक विशेष ओळख मिळाली आहे. केंद्र सरकार सध्या नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य देत आहे. अशा शेतीसाठी ‘श्वेत कपिला’सारख्या देशी गायींपासून बनवलेले ‘जीवामृत’ आणि ‘घनजीवामृत’ यांचा वापर केला जातो.