अपघातातील मृतदेहांची ‘डी.एन्.ए.’ चाचणी होणार !
जळगाव – येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांमध्ये ७ प्रवाशांची ओळख पटली असून ओळख न पटलेल्या मृतदेहांची ‘डी.एन्.ए.’ चाचणी केली जाणार आहे. त्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न झालेले असल्याने ओळख पटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
टोरेस गैरव्यवहार प्रकरण ‘ईडी’च्या १३ ठिकाणी धाडी !
मुंबई – टोरेस गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) १३ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. त्यात मुंबईतील १० आणि जयपूर येथील ३ ठिकाणांचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीने २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. त्याविषयीही अन्वेषण चालू आहे.
पालघरमध्ये ‘सायबर गुन्हेमुक्त गाव’ मोहीम !
पालघर – सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून होणारी फसवणूक म्हणजे आर्थिक आतंकवाद असून नागरिकांमध्ये सायबर साक्षरता निर्माण करणे, तसेच फसवणूक झाल्यास अशा प्रकरणांचा छडा लावण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे या दृष्टीने पालघर जिल्हा पोलिसांनी ‘सायबर गुन्हेमुक्त गाव’ मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. नागरिक आणि पोलीस यांच्यात समन्वयक म्हणून या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सायबर कमांडो आणि ८०० सायबर योद्धे निर्माण करण्यात येणार आहेत.
सैफ प्रकरणातील चाकूचा तिसरा भाग सापडला !
मुंबई – अभिनेते सैफ अली खान यांच्यावरील चाकू आक्रमण प्रकरणातील चाकूचा तिसरा भाग पोलिसांना वांद्रे तलावाजवळ आढळला. आरोपीने चाकूचे हँडल तेथे फेकले होते. तो तुकडा पोलिसांनी जप्त केला.
उल्हासनगर येथे ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार !
उल्हासनगर – येथील ६ वर्षांच्या मुलीवर तिचे आई-वडील घरात नसतांना शेजारी रहाणार्या १२ वर्षीय मुलाने आणि त्याच्या वडिलांनी चॉकलेटचे आमीष दाखवून अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अल्पवयीन मुलगा आणि त्याचे वडील यांना अटक केली आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
संपादकीय भूमिका : वासनांधतेने गाठलेली परिसीमा !
कुख्यात खंडणीखोर डी.के. रावसह ७ आरोपींना अटक !
मुंबई – मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कुख्यात खंडणीखोर डी.के. रावसह ७ आरोपींना अटक केली आहे. त्यांनी एका हॉटेलचालकाकडे २.५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न मिळाल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ही कारवाई केली आहे.