शिस्तप्रिय, लोकसंग्रह करणारे आणि गंभीर आजारपणातही आनंदी असणारे मुलुंड, मुंबई येथील कै. सुरेश जगन्नाथ कोचरेकर (वय ७५ वर्षे) !

‘१३.१.२०२५ या दिवशी माझे बाबा सुरेश जगन्नाथ कोचरेकर (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. २४.१.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त ‘त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या आजारपणात आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे’ येथे दिली आहेत. 

कै. सुरेश कोचरेकर

१. शिस्तप्रिय

बाबा कडक शिस्तीचे होते. पूर्वी आम्ही चाळीत रहायचो. ‘आमचे मित्र कोण आहेत ? आम्ही कुठे जातो ?’, याची ते व्यवस्थित माहिती ठेवत. ‘संध्याकाळच्या आत मुलांनी घरात आलेच पाहिजे’, असा त्यांचा नियम होता. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या संगती किंवा व्यवहार यांपासून आम्ही दूर राहिलो.

२. बाबांना ‘विद्युत् जोडणी, सुतारकाम, प्लंबिंग, बांधकाम’, अशी विविध कौशल्ये आत्मसात होती. 

३. नियोजनकौशल्य

बाबांनी त्यांच्या बहिणींच्या लग्नात केलेला व्यय, तसेच कोणाशीही केलेले आर्थिक व्यवहार इत्यादी नोंदवहीत व्यवस्थित लिहिलेले होते.

४. इतरांना साहाय्य करणे

बाबांनी अनेकांना गावाहून मुंबईत आणले. त्यांच्या रहाण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली. कोणाकडे शिधा नसेल, तर ते स्वतःच्या घरातील धान्य त्यांच्या घरी नेऊन देत असत. आमच्या घराच्या समोरच महापालिकेचे रुग्णालय असल्याने गावाहून उपचारासाठी एखादी ओळखीची व्यक्ती आल्यास ‘तिला रुग्णालयात जाऊन सहकार्य करणे’, असे साहाय्य ते करत असत.

५. लोकसंग्रह

त्यांच्या निधनानंतर पंचक्रोशीतील अनेक जण आम्हाला भेटायला आले. कधीही इतरांच्या घरी न जाणारे आसपासचे आणि परिचयाचे लोक हेसुद्धा आम्हाला आवर्जून भेटायला आले. अगदी काही दिवसांपासून जोडलेली माणसे आणि आसपासचे दुकानदारसुद्धा बाबांच्या जाण्यामुळे अस्वस्थ झाले. त्यामुळे ‘बाबांनी माणसे कशा प्रकारे जोडून ठेवली होती ?’, हे आम्हाला शिकायला मिळाले.

६. बाबांनी केलेली साधना 

६ अ. उपवास आणि व्रते करणे : बाबांनी आरंभीपासून अनेक वेळा सोळा सोमवारचे व्रत केले. त्या कालावधीत त्यांचे सोवळे कडक असायचे. त्यांनी आयुष्यभर सोमवारचा उपवास आणि ‘शिवलीलामृत’ या ग्रंथाचे नियमित वाचन केले. गोकुळाष्टमी आणि संकष्ट चतुर्थी या दिवशी त्यांचा उपवास असायचा. त्या वेळी त्यांनी केलेले भावपूर्ण पूजन आम्हाला फार आनंद द्यायचे.

६ आ. प.पू. राऊळ महाराज यांचा सत्संग लाभणे आणि त्यांची सेवा करणे : पिंगुळी (सिंधुदुर्ग) येथील प.पू. राऊळ महाराज आमच्या गावातील घरी नेहमी यायचे. तेव्हा बाबांना त्यांचा सत्संग लाभायचा. प.पू. राऊळ महाराज त्यांना स्वतःसह भ्रमण करायला घेऊन जायचे. महाराजांवर बाबांची पुष्कळ श्रद्धा होती. महाराजांनी त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन गावातील एका व्यक्तीला सांगून आमच्यासाठी एक ‘मांगर (गावातील लहान घर)’ बांधून द्यायला सांगितले होते.

७. मुलाच्या साधनेला पाठिंबा देणे

आरंभी त्यांनी माझ्या सनातनच्या मार्गदर्शनुसार साधनेला पुष्कळ विरोध केला; परंतु ‘कालांतराने त्यांनी माझ्या साधनेला पाठिंबा दिला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. ते सनातनने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला यायचे. साधक घरी आल्यानंतर त्यांच्याशी छान संभाषण करायचे. त्यांनी साधकांना कधीही दुखावले नाही.

८. बाबांचे आजारपण 

श्री. सतीश कोचरेकर

८ अ. पुष्कळ यातना होत असूनही आनंदी असणे : वयाच्या ७२ व्या वर्षी बाबांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. आधुनिक वैद्यांनी त्यांचे मूत्राशय काढण्याचे शस्त्रकर्म करण्यास सांगितले. ते बाबांनी शांतपणे स्वीकारले. एवढ्या मोठ्या शस्त्रकर्मानंतर विविध कारणास्तव रुग्णालयात येतांना कोणत्याही प्रकारची चिंता किंवा त्रास त्यांच्या चेहर्‍यावर जाणवत नसे. त्यांनी ४ वर्षे पुष्कळ यातना सहन केल्या; परंतु तेव्हाही ते आनंदी असायचे.

८ आ. बाबांच्या आजारपणात अनुभवलेली संतांची कृपा !

८ आ १. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर बाबांचे त्रास न्यून होणे : बाबांनी आजारपणात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केला. तो नामजप केल्यावर बाबांना बरे वाटायचे. एकदा २ दिवस बाबांना शौचाला होत नव्हते. त्यांच्या आतड्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण झाला होता. आम्ही स्थानिक रुग्णालयात दाखवल्यावर आधुनिक वैद्यांनी आम्हाला बाबांचे शस्त्रकर्म करण्याचा सल्ला दिला. आम्ही सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी सद्गुरु गाडगीळकाकांनी कळवलेले नामजपादी उपाय सांगितले. ते उपाय केल्यावर केवळ तीन घंट्यांतच बाबांच्या आतड्यातील अडथळा दूर होऊन त्यांना शौचाला झाले.

८ आ २. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे मार्गदर्शन ऐकून हलके वाटणे आणि त्यांनी दिलेला प्रसाद बाबांना भरवल्यावर मन स्थिर होणे : गेल्या दोन मासांत बाबांच्या प्रकृतीत सतत बिघाड होत होता. त्यांना सतत रुग्णालयात भरती करावे लागत होते. ‘त्यांचे वय आणि आजारपण यांमुळे अधिक काहीही करू शकत नाही’, हे समजत असूनही मला स्वतःला स्थिर ठेवता येत नव्हते. त्या वेळी मी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर मला पुष्कळ हलके वाटले. त्यांनी माझ्याकडे बाबांसाठी प्रसाद आणि विभूती दिली. घरी आल्यानंतर मी तो प्रसाद बाबांना भरवला आणि विभूती लावली. त्यानंतर माझे मन पुष्कळ स्थिर झाले.

९. महाकुंभाच्या पवित्र दिवशी बाबांनी माझ्या मांडीवरच शांतपणे प्राण सोडला. 

१०. निधनानंतर जाणवलेली सूत्रे 

अ. बाबांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधीपासून घरात चालू असलेला दत्तगुरूंचा नामजप आणि उपाय यांमुळे बाबांच्या मृत्यूसमयी वातावरणात जडपणा मुळीच जाणवत नव्हता.

आ. ‘इथे कोणाचा मृत्यू झाला आहे’, असे वाटतच नाही. एखादा सोहळा असल्यासारखे वातावरण आहे’, असे माझ्या आते बहिणीने सांगितले.

इ. ‘इस्कॉन’च्या माध्यमातून साधना करणार्‍या एक साधिका आम्हाला भेटायला आल्या होत्या. त्यांनाही वातावरण पुष्कळ सकारात्मक असल्याचे जाणवले.

‘हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, आपल्या कृपेने आमच्या आणि बाबांच्या आयुष्यातील अत्यंत खडतर प्रारब्ध आपण सुसह्य केलेत. मी आम्हा कुटुंबियांच्या वतीने आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता अर्पण करतो आणि ‘बाबांना सद्गती मिळून आपल्या श्री चरणी स्थान मिळावे’, अशी प्रार्थना करतो.’

– श्री. सतीश कोचरेकर (सुरेश कोचरेकर यांचा मुलगा), देवद, नवीन पनवेल. (२२.१.२०२४)