कोळ्याच्या जाळ्यात अडकणे !

वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी

या वर्षी श्री क्षेत्र प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे महाकुंभमेळा चालू आहे. शैव, शाक्त, वैष्णव, सौरी, गाणपत्य असे विविध पंथ, उपपंथ, तंत्र अशा विविध क्षेत्रांतील, संप्रदायातील संत, महंत, उपासक, अभ्यासक, योगी मंडळी तिथे जमली आहेत. माध्यमांतून यातील एका तरी पंथाचे अधिकारी, सत्पुरुष व्यक्तीची माहिती त्यांचे आचरण, उपासना, संप्रदाय यांविषयी अभ्यासपूर्ण काही ‘डॉक्युमेंटरी’ (लघुपट) आपल्यासमोर आलेली पाहिली आहे का ? नाही ना ! अनेक आखाडा प्रमुख, संत, महंत, शंकराचार्य यांच्यासमवेत गोरक्षण, धर्मांतर, अनेक मंदिरांविषयी चालू असलेल्या कायदेशीर लढाया यांविषयीची पुढील दिशा ठरवण्यासाठी तिथे अनेक बैठका चालू आहेत. अनेक अनुष्ठाने राष्ट्र कल्याणाकरता चालू  आहेत. याविषयी काही दाखवतांना पाहिले आहे का ? नाही ना !

आपल्यासमोर दिवसभर काय दाखवले जाते माळ विकणारी सुंदर मोनालिसा, तिचा दिनक्रम, ‘आयआयटी’ बाबा (जे आता उपासना चालू करत आहेत.), नाही तर नागा साधू, कुंभमेळा हा उपासनेचा, अभ्यासाचा, ज्ञानाच्या आदानप्रदानाचा, परीक्षेचा विषय आहे. त्यात स्नान आणि बाकी जे आपण सर्पमाळा, रुंडमाळा धारण करणारे, नृत्य करत शंखनाद, डमरू नाद करत धावत जाणारे साधू पहातो, हा त्यातील थोडा मनोरंजनाचा विषय आहे. तो थोडा त्यातील विरंगुळा आहे. अनेकांनी कीर्तन, प्रवचने ऐकली आहेत. त्यातील ज्ञानाचा भाग हा थोडा क्लिष्ट असतो. तो सतत ऐकून थोडा कंटाळा आला, तर ही बौद्धिक सुस्ती घालवण्यासाठी एखादी कथा अथवा विनोद, थोडेसे नामस्मरण, फुगडी घालणे, फेर धरणे असे करतात. केवळ विनोद, फुगडी आणि नाचणे, म्हणजे कीर्तन, प्रवचन होत नाही, तसेच कुंभमेळ्यासंबंधी जाणावे !

माध्यमे आपणास नको त्या गोष्टीत गुंतवत आहेत आणि आपण गुंतत आहोत. या गुंतण्याने स्वतःचा गैरसमज दृढ होतो. तेव्हा त्यात गुंतू नका, अडकू नका. पोरगी, बाबा यांत न अडकता महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या !

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. (२१.१.२०२५)