प्रयागराज, २३ जानेवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यासाठी एकूण १ लाख ४० सहस्र प्रसाधनगृहे उभारण्याचे उद्दिष्ट उत्तरप्रदेश सरकारच्या नगर विकास विभागाने निश्चित केले आहे; मात्र अद्यापही २३ सहस्र ८३० प्रसाधनगृहे उभारणे प्रलंबित आहे. २ दिवसांपूर्वी नगरविकास विभागाकडून महाकुंभ मेळ्यातील विविध सेवांचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आला. याविषयीची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे.
या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रलंबित सेवा गतीने पूर्ण करण्याची सूचना केली आहे. महाकुंभमेळ्यात वाढत्या भाविकांमुळे या प्रसाधनगृहांची आवश्यकता भासणार आहे. महाकुंभमेळ्यातील अद्याप एकच अमृतस्नान संपन्न झाले आहे. मौनी अमावस्येला प्रयागराज येथे भाविकांची सर्वाधिक गर्दी होते. त्या अनुशंगाने प्रसाधनगृहांची आवश्यकता भासणार आहे. या महाकुंभमेळ्यात एकूण ८१ सहस्र सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यांतील ६७ सहस्र पूर्ण झाली आहेत. संस्थांसाठी ४९ सहस्र प्रसाधनगृहांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यांतील ४० सहस्र ६७० प्रसाधनगृहे पूर्ण झाली आहेत. प्रशासनाची प्रसाधनगृहे १० सहस्र निश्चित करण्यात आली असून त्यांमधील ८ सहस्र ५०० प्रसाधनगृहे उभारणे शिल्लक आहे.
अशा प्रकारे उभारली जात आहेत तात्पुरती प्रसाधनगृहे !
प्रसाधनगृहे उभारण्याचा ठेका प्रशासनाकडून विविध खासगी आस्थापनांना देण्यात आला आहे. गंगा नदी आणि त्रिवेणी संगमाच्या काठावर एका रांगेत ही तात्पुरती प्रसाधनगृहे ठेवण्यात आली आहेत. वाळवंटामध्ये खड्डे खणून त्यांत ३ सहस्र लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या टाक्या पुरण्यात येत आहेत. प्रसाधनगृहातील मलाचा निचरा या टाकांमध्ये केला जात आहे.