Pakistani CM Minority Card : पंजाब प्रांतातील अल्पसंख्यांकांना प्रति तिमाही मिळणार १० सहस्र ५०० रुपये !

पाकिस्तानची पहिली ‘मुख्यमंत्री अल्पसंख्यांक कार्ड’ योजना कार्यान्वित

पंजाब (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी पाकिस्तानची पहिली ‘मुख्यमंत्री अल्पसंख्यांक कार्ड’ योजना चालू केली आहे. या  योजनेच्या अंतर्गत पंजाबचे मरियम नवाझ सरकार प्रांतातील ५० सहस्र अल्पसंख्यांक कुटुंबांना प्रति तिमाहीत १० सहस्र ५०० रुपये (सुमारे ३ सहस्र २०० भारतीय रुपये) देणार आहे. सणांच्या काळात ही रक्कम १५ सहस्र रुपयांपर्यंत वाढवली जाईल, असेही नवाझ यांनी सांगितले.

नवाझ म्हणाल्या की, अल्पसंख्यांक समुदायाचे रक्षण करणे आणि त्यांचे जीवन सुधारणे, हे आपले दायित्व आहे. अल्पसंख्यांक समुदायाच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण करणार्‍यांना आपण पूर्ण शक्तीने रोखू, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. (मरियम नवाझ यांच्या अशा बोलण्यावर एखादे शेंबडे पोरतरी विश्‍वास ठेवेल का ? ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’, असाच हा प्रकार आहे ! – संपादक)

पंजाबचे अल्पसंख्यांक मंत्री रमेश सिंह अरोरा म्हणाले की, ते स्वतः अल्पसंख्यांकांच्या कारभारावर लक्ष ठेवतात.

संपादकीय भूमिका 

एकीकडे कायदा करून हिंदूंच्या मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याच्या परंपरेला इस्लामविरोधी संबोधून त्याविरुद्ध कायदा करायचा आणि दुसरीकडे अशा प्रकारे अर्थसाहाय्याचे नाटक करायचे ! भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या पाकमध्ये या रक्कमेपैकी प्रत्यक्षात काहीतरी पैसे तेथील हिंदूंना मिळतील का, हा प्रश्‍न रहातोच !