IIT Madras On Gomutra Properties : गोमूत्रात विषाणू आणि बुरशी विरोधी गुणधर्म असून ते पचनसंस्था निरोगी ठेवते ! – ‘आय.आय.टी. मद्रास’चे संचालक व्ही. कामकोटी

काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम् यांची कामकोटी यांच्यावर टीका

(आय.आय.टी., म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – भारतीय तंत्रज्ञान संस्था)

‘आय.आय.टी. मद्रास’चे संचालक व्ही. कामकोटी

चेन्नई (तमिळनाडू) – ‘आय.आय.टी. मद्रास’चे संचालक व्ही. कामकोटी यांचा गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांवरील विधानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. यात कामकोटी हे गोमूत्राचे आरोग्यासाठीच्या लाभाविषयी सांगत आहेत. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम् यांनी त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत ‘ते बनावट विज्ञानाला प्रोत्साहन देत आहेत’, असे म्हटले.

१. व्ही. कामकोटी यांनी ‘पोंगल’च्या निमित्ताने गायींच्या संवर्धन कार्यशाळेत भाग घेतला होता. हा कार्यक्रम १५ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांविषयी सांगितले की, गोमूत्रात विषाणू आणि बुरशी विरोधी गुणधर्म आहेत. या व्यतिरिक्त ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि ‘इरिटेबल बोवेल सिंड्रोम’सारख्या (जठराच्या संदर्भातील आजार) पचन समस्यांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, तसेच गोमूत्र सेंद्रिय शेतीसाठीही पुष्कळ लाभदायक ठरू शकते.

२. कार्ती चिदंबरम् यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, आय.आय.टी. मद्रासच्या संचालकांनी छद्म विज्ञानाचा प्रचार करणे अत्यंत लज्जास्पद आहे आणि आय.आय.टी.सारख्या प्रतिष्ठित संस्थेसाठी ते अयोग्य आहे.

संपादकीय भूमिका

गोमूत्राला हिंदु धर्मानुसार पवित्र मानले गेले आहे आणि त्याचे प्राशन अनादी काळापासून केले जात आले आहे. विज्ञानाला त्याचे महत्त्व आता लक्षात येणे, हा विज्ञानाचा थिटेपणा आहे; मात्र त्याच्यावरही आक्षेप घेणार्‍या काँग्रेसवाल्यांची हिंदु धर्मद्वेषी मानसिकता यातून पुन्हा लक्षात येते !