‘अथर्ववेदात म्हटले आहे की, ब्रह्मांडकाळी स्थापित केलेला हा भरलेला कुंभ आहे. संत-ज्ञानीजन याला दिवस-रात्रीसारखे विभिन्न रूपात पहातात. काळ प्रकट होऊन दृश्यमान स्वरूपातील प्राणीमात्राला आपल्यामध्ये सामावून घेतो. विद्वान महर्षी या काळाला विकाराविना आकाशासारखे सांगतात. अशाच प्रकारे अथर्ववेदात ब्रह्मदेव म्हणतात, ‘हे मनुष्यांनो ! मी तुम्हाला लौकिक आणि पारलौकिक सुख प्रदान करणार्या ४ कुंभ पर्वांचे निर्माण केले आहे. या काळात या ४ स्थानांवर (हरिद्वार, प्रयाग, उज्जैन, नाशिक) जाऊन स्नान केल्यावर देवांसारखे अमृत देऊन तुम्हाला अमरत्वाचा पवित्र संदेश देत आहे.’ साधारणतः कुंभचा अर्थ घडा मानले जाते; परंतु गांभीर्याने विचार केल्यावर ‘यत्पिण्डे तत्ब्रह्माण्डे ।’, म्हणजे ‘जे पिंडात (शरिरात) ते ब्रह्मांडात’, या दिशेने तो संकेत करतो. मनुष्याच्या आतसुद्धा परमात्म्याने विराट ब्रह्मांडाची रचना करून ठेवली आहे.
१. अमृत घटस्थापना
‘अमृत घटाची स्थापना करणे, याचा अर्थ अमरत्व प्राप्त करणे’, असासुद्धा होऊ शकतो. जिवाला सर्वांत मोठे भय मृत्यूचे असते. आत्मबोध होणे, हीसुद्धा अमृततत्त्वाची प्राप्तीच म्हटली जाऊ शकते. देवगण पयस्विनीचे पेयपान करूनच अमर झाले आहेत. गीतेत म्हटले आहे, ‘मनुष्याचे शरीर मरते, आत्मा मरत नसतो.’ तरीही शरिरावर मोह-माया ठेवणे, हे व्यक्तीचे मोठे अज्ञानच असते. कुणीही लहान-मोठा प्राणी मृत्यूपासून वाचू शकत नाही. शास्त्रकारांनी देवतांना ‘अमर’ म्हटले आहे; परंतु देवगणसुद्धा पूर्णतः अमर नाहीत. ते मृत्यूलोकवासियांपेक्षा दीर्घायुषी निश्चितच असतात. त्यांचे एक दिवसरात्र मनुष्याच्या एक वर्षाएवढे (६ मास दिवस आणि ६ मासाची रात्र) असते. सूर्य जोपर्यंत उत्तरायणात असतो, तोपर्यंत देवतांचा दिवस असतो आणि सूर्य दक्षिणायनाच्या काळात देवतांची रात्र असते. या कालगणनेत कुंभमेळ्याचा कालावधी केवळ १०० वर्षे मानला गेला आहे. हे मनुष्याच्या ३६ सहस्र वर्षांपेक्षा काही अधिकच आहे. आमच्या दृष्टीने कुंभमेळा हा अमर असल्याची प्रचीती होते; कारण की, एवढ्या कालावधीत मानवाच्या सहस्रो पिढ्या होऊन गेलेल्या असतात. उदाहरणासाठी डास आणि पतंग यांच्या दृष्टीत मनुष्यसुद्धा एक प्रकारे अमरच आहे; कारण की, मनुष्याच्या जीवनकाळात त्यांच्या सहस्रो पिढ्या नष्ट झालेल्या असतात. त्यामुळे देवतांनासुद्धा अमर म्हणणे तर्क सुसंगत नाही.
श्रीमद्भगवद्गीतेत लिहिले आहे, ‘स्वर्गलोकातील सुख भोगणे आणि पुण्य नष्ट झाल्यावर जीव पुन्हा मृत्यूलोकात येतो.’ ही मान्यता अमृताविषयी चपखल बसते. ‘भगवती श्रुति’मध्ये असे म्हटले आहे, ‘आम्ही सोमपान करून अमरत्व प्राप्त केले आहे.’ गीतेमध्ये ‘सोमपान केल्यामुळे इंद्रलोकाची प्राप्ती होते’, असा उल्लेख आला आहे. वास्तविक यांना सापेक्ष अमरत्वाचीच संज्ञा दिली जाऊ शकते, जेव्हा जीवन-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा अर्थ काही वेगळाच आहे. प्रत्येक जन्म घेणार्या जिवाचा मृत्यू तर निश्चितच आहे. तो टाळता येत नाही. वैज्ञानिक संशोधनात सुद्धा या दिशेने कोणतीही योग्य पावले उचलली गेली नाहीत. वास्तविक अमृततत्त्वाच्या प्राप्तीचा अभिप्राय मनुष्य योनीचे पवित्र प्रयोजनच प्राप्त करायचे आहे. मृत्यूच्या विषाला समजून घेतल्यानंतरच जीवनाचे अमृत प्राप्त केले जाऊ शकते. शास्त्रामध्ये याला ‘निःश्रेयस’ असे संबोधित करण्यात आले आहे, जे मानवी देहातच शक्य आहे. त्यामुळे याला देवदुर्लभ म्हटले जाते. जर देवता अमर असते, तर ते मानवी शरिरात येण्यासाठी कशाला आतूर झाले असते ?
२. मानवीय सद्गुणच अमृत
देवगणाच्या तुलनेत मनुष्य योनीला श्रेष्ठतम मानण्यामागे एकच रहस्य आहे ते, म्हणजे अमृततत्त्व प्राप्त करणे आहे. जे प्राप्त केल्यावर कायम स्वरूपासाठी यमयातना नष्ट होतात आणि जीवनाचे सत्य समोर साकार होऊन उभे ठाकते. स्कंद पुराणात लिहिले आहे, ‘त्याचेच कुळ पवित्र मानले जाते, त्याचीच माता कृतार्थ आहे आणि पृथ्वीसुद्धा त्यामुळे पुण्यवती संबोधन करून ओळखली जाते, जो आपले परम ध्येयरूपी अमृततत्त्व प्राप्त करून घेतो. शास्त्रकारांनी याला अमृतस्वरूप घट प्राप्त करण्यासाठीचे कितीतरी उपाय सुचवले आहेत. मानवी पुण्य प्रयोजन प्राप्त करण्यासाठी कोणतेही पवित्र प्रयत्न ‘अमृतोपमच’ म्हटले जातील.’
‘कैवल्योपनिषदा’त म्हटले आहे, ‘सकाम कर्मांनी नाही, संततीने नाही आणि कोणत्याही संपत्तीनेसुद्धा अमृताची प्राप्ती होत नाही, त्यासाठी केवळ त्यागच कामी येतो, म्हणजे मानवीय सद्गुणच अमृताच्या श्रेणीत गणले जाऊ शकतात.’ ‘कठोपनिषदा’त ‘निष्काम भावाने केलेली सर्व कार्ये अमृतासारखीच असतात. परमात्मविषयक ज्ञानाची तुलनासुद्धा अमृताशी करण्यात आली आहे; कारण की, परमात्मतत्त्व जाणून घेतल्यानंतर व्यक्ती अमर होऊन जाते. ईश्वराचे नामसुद्धा अमृतासारखे आहे.’ ‘पद्मपुराणा’च्या उत्तराखंडात म्हटले आहे, ‘हरिचे नाम निरंतर उच्चार करत मानव जीवनमुक्त होऊन जातो.’ संस्कृतामध्ये ‘प्रसाद’ शब्दाचे कितीतरी अर्थ निघतात. ईश्वर आणि महापुरुष यांची कृपा, अनुग्रह आणि आशीर्वाद सुद्धा एक प्रकारचा ‘प्रसाद’ असतो. अंतःकरणाची पवित्रता आणि प्रसन्नता यांनासुद्धा प्रसादाच्या अंतर्गत गणले जाते. गीतेमध्ये म्हटले गेले आहे, ‘परमात्म्याचा अनुग्रहरूपी प्रसाद मिळाल्यावर जीवनातील सर्व दुःख दूर होतात.’
३. यज्ञीय जीवनसुद्धा अमृततुल्य
मनुष्याचे यज्ञीय जीवनसुद्धा अमृततुल्य मानले जाते. मानवाच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी कुंभमेळ्याचे आयोजन होत आले आहे. पौराणिक आख्यानांमध्ये कुंभमेळ्याची संख्या १२ सांगितली गेली आहे, ज्यामध्ये ४ पृथ्वीलोक, म्हणजे मृत्यूलोक आणि भारताच्या पुण्य प्रक्षालित भूमीत साजरे केले जातात. कालगणनेच्या दृष्टीने असे ग्रहयोग १२ वर्षांनंतरच येतात. गंगातटावरील हरिद्वार, त्रिवेणी संगम घाटावरील प्रयागराज, क्षिप्रा तटावरील उज्जैन आणि गोदावरीच्या पवित्र कुशीत वसलेले नाशिक या ४ ठिकाणी हा पवित्र उत्सव १२ वर्षांनंतर साजरा करण्याचे विधीविधान शास्त्र अन् विज्ञान संमतसुद्धा आहे.
कोणतेही धर्मानुष्ठान ठरवलेल्या काळात आणि ठरवलेल्या स्थानी करणे, हे विशेष पुण्यदायी आणि फलदायी होते. कालचक्रात सूर्य, चंद्र आणि बृहस्पति यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. तिन्ही योगांचे कुुंभमेळ्याच्या उत्सवाचा हा मूळ आधार आहे; कारण की या स्थितीमध्ये सर्व ग्रह मैत्रीपूर्ण आणि उच्च मानले जातात. त्याच प्रकारे जेव्हा मानव जीवनात सज्जनांच्या संगतीचा योग असतो, तेव्हाच सद्चिंतन प्रकट होऊ लागते.
गायत्री परिवाराचे जनक पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी ‘प्रज्ञोपनिषदा’मध्ये जगाच्या मूलभूत समस्यांचे मुख्य कारण अचिंत्य-चिंतनच सांगितले आहे. त्यांच्या द्वारे संचालित वैचारिक क्रांतीच्या उपक्रमाचे एकच ध्येय आहे की, जनजीवनात सद्चिंतन आणि सत्कर्म यांचा विकास अन् विस्तार व्हावा. देव संस्कृतीचे हेच २ आधार आहेत. युग परिवर्तनाच्या या पवित्र काळात सर्व जनतेला या दोन गोष्टींचे अमृतपान करवणे, हाच पवित्र महाकाळाच्या उपक्रमाचा शुभारंभ होईल, जो पवित्र त्रिवेणी संगमावरूनच आरंभ होत असल्याची प्रचीती येते.
लेखक : डॉ. प्रणव पंड्या, हरिद्वार, उत्तराखंड.
(लेखक डॉ. पंड्या हे गायत्री परिवाराचे प्रमुख आणि हरिद्वारच्या ‘संस्कृति विश्वविद्यालया’चे कुलाधिपती आहेत.)
(साभार : मासिक ‘युगवार्ता’)