महाकुंभातील एकूणच व्यवस्था, सुविधा हा प्रशासकीय व्यवस्थेचा भाग आहे, तरी पूर्वापार हा महाकुंभ विशेष सुविधा, सवलती, व्यवस्था नसतांनाही चालू होता. कुंभमेळ्याचे महत्त्व हिंदु धर्मीयांना पूर्वापार माहिती असल्याने पृथ्वीवरच्या या सर्वांत मोठ्या धार्मिक मेळाव्याला निमंत्रण न देताही कोटी कोटी भाविक उपस्थित असतात.
१. धार्मिक वृत्तीचे हिंदू
कुंभमेळ्यात अगदी दूरदूरहून लोक येतात, म्हणजे भारताच्या कानाकोपर्यातून भाविक येतात. यातील सर्वच भाविक येथे रेल्वे किंवा विमान यांची तिकिटे काढण्याचा, येथे राहून येथील रहाण्याचा व्यय भागवू शकतात असे नसते. अनेक भाविक गरीब, मध्यम वर्गातील अल्प उत्पन्न गटातील आहेत, तरी ते सर्व कुटुंबासह येथे येतात. काही जण तर नातेवाइक, मित्र परिवार यांच्यासह २० ते ३० जणांच्या गटाने येतात. काहींना येथे कुठे रहायचे ? तात्पुरता तंबू कुठे उभारायचा ? हेसुद्धा येथे येऊन ठरवायचे असते. भगवान शिवावर पूर्ण श्रद्धा ठेवून कुंभनगरीत काठीला विशिष्ट ध्वज, निशाण लावून श्रद्धावानांचे जथ्येच्या जथ्ये येणे, हीच सनातन धर्माच्या अद्वितीयत्वाची खूण आहे. कुंभनगरीत येण्यासाठी सरकारने विशेष रेल्वेच्या सुविधा केल्या आहेत. तरी त्यांची तिकिटे नेहमीच्या तिकिटांपेक्षा अधिक मूल्याची आहेत. येथे सरकारकडून सामायिक तंबूंच्या केलेल्या व्यवस्था अल्प दरात असल्या, तरी ‘टेंट सिटी’मध्ये अधिक रुपये देऊन रहावे लागणे, जे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. अशांना मोकळ्या जागी तंबू बांधून रहाण्याला पर्याय नसतो. यामध्ये कल्पवासींना (काही दिवस गंगेच्या पात्रात राहून साधना करणार्या व्यक्ती) काही सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असला, तरी तेथे सुविधा पोचलेल्या नाहीत. केवळ अतिशय असुविधा झाल्या, तर ते आणि अन्य साधू आवाज उठवतात. लोक थंडीतही कुंभक्षेत्रात थांबतात. येथे सरकारी तंबूंमध्ये १० लाख लोक राहू शकतील एवढी क्षमता या वेळच्या नियोजनानुसार आहे. उर्वरित लोकांना मिळेल, तिथे रहावे लागते. अगदी रस्त्याच्या कडेला छोटे तंबू अथवा आडोसा करून रहावे लागू शकते.
२. दिवसभरात रामकथा, प्रवचने, भागवत कथा
कुंभनगरीत संतांच्या छावणीत दिवसभर रामकथा, प्रवचने, सत्संग, भागवतकथा, भगवद्गीता इत्यादी कार्यक्रम चालू असतात. कुंभनगरीत येणारे लोक या रामकथा, प्रवचने यांना उपस्थिती लावतात. कल्पवासी त्यांची प्रवचने ऐकण्यास येतात. तेथे संबंधित छावणीचे प्रमुख साधू-संत लोकांना मार्गदर्शन करतात. लोक येथून साधना बोध घेऊन जातात. हिंदु धर्मियांना धर्म समजण्यासाठी, जीवनातील अध्यात्माचे महत्त्व लक्षात येण्यासाठी संत-महंतांचे मार्गदर्शन पुष्कळ उपयुक्त ठरते. भाविकाला येथे त्याच्या आवडीनुसार उपासनामार्गाचे बोधामृत मिळते, जेणेकरून तो पुढील जीवन चांगल्या प्रकारे धर्मनीती समजून घेऊन जगू शकतो. येथील हवेत पुष्कळ गारवा असतो, पुष्कळ थंडी असते, तरी स्वेटर, पायमोजे घालून भाविक उत्साहाने या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात, म्हणजेच भाविकांना असा साधनाबोध आवश्यक असतो.

३. कुंभनगरीत शेकडो यज्ञांद्वारे वेदमंत्रांचा निरंतर उद्घोष !
कुंभनगरीत मोठे आखाडे, प्रसिद्ध असलेले कथाकार, प्रवचनकार, प्रसिद्ध साधू-संत यांच्या छावणीत भव्य आणि शेकडो यज्ञकुंड असलेल्या यज्ञशाळांची उभारणी केली जाते. या यज्ञांचा भाविकांना लाभ घेता येतो. काही महायज्ञ पूर्ण कुंभमेळ्याचा कालावधीप संपेर्यंत चालतात, काही महिनाभर, तर काही आठवडाभर चालू असतात. या यज्ञांसाठी लाकूड, बांबू वापरून आकर्षक रचना असलेले, प्राचीन साधू-संतांच्या कुटींची आठवण करून देणार्या यज्ञशाळांमध्ये हे यज्ञ पार पडतात. कोणताही वैयक्तिक स्वार्थ न बाळगता गोरक्षण, विश्वशांती, पाकव्याप्त काश्मीरची मुक्तता होणे इत्यादी समष्टी उद्दिष्टांसाठी यज्ञयाग केले जातात.
४. शासनाकडून काही स्तुत्य प्रयत्न !
शासनाने महाकुंभाच्या विज्ञापनासाठी जे मोठे लाकडी फलक (कटआऊट) लावले आहेत. त्यावर उद्बोधक घोषवाक्ये लिहिली आहेत. ज्यामध्ये ‘जनम जनम के पुण्य फले, आओ महाकुंभ चले’ याचा समावेश आहे. सरकारकडून शुद्ध हिंदी भाषेचा उपयोग फलक, सूचना देणे, माहितीपत्रके यांसाठी केला जात आहे. पोलिसांना साधू-संत आणि भाविक यांच्याशी कसे वागायचे ? याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे यंदा साधू-संतांची गाडी आल्यावर कामावरील पोलीस त्यांना थोडे वाकून नमस्कार करत. भाविक जी चौकशी करत, तिचे उत्तर पोलीस अधिक शांतपणे आणि संपूर्ण तपशिलासह देतांना दिसले. पोलिसांमध्ये एरव्ही वाटणारा उर्मटपणा येथे दिसला नाही. पोलीस एकदम सहकार्य करतांना दिसत असल्याचे लक्षात आले.
५. कलाकुंभातही उत्तरप्रदेशातील हिंदु संस्कृतीला उत्तेजन
येथे उत्तरप्रदेश शासनाने काही छावण्या उभारल्या आहेत. त्यामध्ये कलाकुंभाच्या छावणीतील प्रदर्शन विशेष आहे. त्यामध्येही शासनाने महाकुंभाचा ब्रिटिशांपासूनचा इतिहास, महाकुंभातील व्यवस्था, सुविधा यांचा कसा विकास होत गेला ? उत्तरप्रदेशातील मंदिरे, शिल्पकला, वास्तूकला, चित्रकला, संगीतकला यांचा कसा विकास होत गेला आहे, याची सचित्र वा चित्रांद्वारे माहिती देण्यात आली आहे. ‘उत्तरप्रदेश दर्शन मंडपम्’मध्ये उत्तरप्रदेशातील प्रसिद्ध धार्मिक मंदिरांच्या प्रतिकृती आहेत. मुख्य म्हणजे अन्य धर्मियांची काहीच भलावण या ठिकाणी केलेली नाही. मोगलांचा कसा सहभाग होता वा त्यांचे काय योगदान होते ? याचा कसलाही खोटा उल्लेख केलेला नाही.
६. छावण्यांची भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वारे
कुंभमेळ्यातील आखाड्यांच्या छावण्या, तंबू यांच्या प्रवेशद्वारांची रचना मंदिरांच्या प्रवेशद्वाराप्रमाणे विविध आकारांत, प्रकारांत आणि अतिशय भव्य केलेली असते. प्रवेशद्वारांच्या या रचना लाकूड आणि कापड यांचा उपयोग करून बनवलेल्या असतात. या भव्य रचना काही मंदिरांच्या प्रतिकृती असतात किंवा संबंधित आखाडा, संप्रदाय यांच्या मान्यतेनुसार असू शकतात. ही प्रवेशद्वारे सिद्ध करण्यासाठी शेकडो कारागीर अनेक मासांपासून कार्यरत असतात. आखाडे, संत हे त्यांच्यासमवेत अशा कुशल कारागिरांना त्यांच्या भागातूनच आणतात.
७. अगणित दैवी कणांनी युक्त गंगा नदीची वाळू !
गंगा नदीची कोरडी वाळू रात्री पाहिल्यास ती चमचमतांना दिसते. या वाळूत अगणित दैवी कण दिसून ते चमकतात. आपल्या कपड्यांवर धूलीकण उडाल्यास कपड्यांवर दैवी कण चिकटून कपडेही चमकतात. कुंभनगरीत ‘गंगामैय्या की जय’, असा जयघोष अनेक ठिकाणी ऐकू येतो. अनेक विदेशी गंगानदीत श्रद्धेची डुबकी मारून स्वत:ला भाग्यवान समजतात.
८. विविध साधूंची उपासना

अ. एका साधूंनी विश्वकल्याणासाठी स्वतःचा एक हात ९ वर्षे वर ठेवला आहे. त्यांची नखे वाढली आहेत. त्यांना हात वर केल्यामुळे काही त्रास होत नाही. सर्वांचे भले व्हावे, या दृष्टीने साधू महाराज खटाटोप करत आहेत.
आ. एका साधूंनी डोक्यावर ४५ किलो वजनाचे रुद्राक्ष धारण केले आहे.
इ. काही साधू मोठ्या लोखंडी चाव्या घेऊन फिरत आहेत.
अशी वैशिष्ट्यपूर्ण उपासना करतांना साधू येथे दिसतात. त्यांना विचारल्यास मानव कल्याण, विश्व कल्याण अशा समष्टी हेतूनेच त्यांच्या उपासना चालू आहेत.
कुंभमेळ्यात उच्चविद्याविभूषित युवा साधू, संन्यासी अधिक संख्येत आढळले. लोकांचा अध्यात्म, धर्म यांकडे वाढता कल यातून लक्षात येतो. एकूणच विज्ञानाच्या या काळात लोकांचा साधूंकडे, संतांकडे अजूनही कल वाढत आहे. विदेशी लोक मोठ्या संख्येने काही संप्रदायांशी जोडले गेले आहेत. ते गटागटाने कुंभनगरीत स्नान आणि उपासना करतांना दिसतात.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, कुंभनगरी प्रयागराज, उत्तरप्रदेश. (१५.१.२०२५)
महाकुंभातील मिरवणुका
महाकुंभाच्या क्षेत्रात ज्या पेशवाई मिरवणुका होतात, त्या मोठ्या लवाजम्यासह येतात. त्यात ढोल, वाद्ये यांचे वादन केले जाते. या व्यतिरिक्त पर्व स्नान, अमृत स्नान यांच्या तिथीला काही मोठे संप्रदाय, पीठाधीश्वर यांच्या मिरवणुकाही धार्मिक गाणी वाजवत येतात. कुंभनगरीत साधू, संत, संप्रदाय यांच्या आगमनाने शोभा वाढते. अमृत स्नानाच्या वेळी आखाड्यातील साधू-संत यांना पहिला स्नानाचा मान असतो. त्यांच्या आगमनाची लोक स्नानाच्या मार्गाला दुतर्फा चातकासारखी अगदी पहाटेपासून वाट पहात असतात. आखाड्यातील नागा साधू, अन्य साधू आणि संत यांचे आखाड्याच्या घोषणा, ‘हर हर महादेव’ ‘बम बम भोले’, अशा देवतांच्या नावाचा उद्घोष करत, पारंपरिक शस्त्रे चालवत कुंभनरीतील मुख्य रस्त्यावर आगमन होते, तेव्हा पूर्ण वातावरण पालटून जाते. स्नानाच्या घाटाच्या ठिकाणचे, त्रिवेणी संगमाचा परिसर एकदम दैवी ऊर्जेने भरित होतो. भाविकांना हे चैतन्य ग्रहण करण्यास मिळते, यासह साधू-संत यांच्या स्नानाने भारित झालेल्या नद्यांच्या पाण्याचा आध्यात्मिक लाभ मिळतो. – श्री. यज्ञेश सावंत
भाविकांच्या प्रसाद-महाप्रसादाची संप्रदायांकडूनच व्यवस्था
कुंभक्षेत्रात प्रसाद, महाप्रसादाची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी आध्यात्मिक संप्रदाय, संस्था अन्नछत्रे चालवतात. या अन्नछत्रांमध्ये काही शेकडो ते १० सहस्र लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते. संप्रदाय त्यांच्याशी संबंधित देणगीदार, धनाढ्य भक्त यांच्याकडून देणगी स्वीकारून त्याद्वारे अन्नछत्रांचा व्यय करतात. काही ठिकाणी प्रसाद-महाप्रसाद सिद्ध करण्यासाठी भक्त साहाय्य करतात, तर काही ठिकाणी आचारी ही सेवा करतात. काही संप्रदायांच्या छावणीबाहेर भाविकांच्या प्रसादाची (सकाळचा अल्पाहार) व्यवस्था केलेली असते. येथे रांग लावून प्रसाद वाटप करण्यात येते. काही संप्रदायांमध्ये उदा. शीख भाविकांना प्रसाद-महाप्रसाद वितरण करणे, हे मोठे पुण्यकारक समजले जात असल्याने तेथे लंगर अखंड चालू असतात. काही ठिकाणी प्रवचनानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते. – श्री. यज्ञेश सावंत
दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात. |