‘भाषा शुद्ध लिहिली पाहिजे’, या भाषाभिमानाच्‍या अभावी मराठीत अशुद्ध लिखाणाचे प्रमाण अधिक !

माझिया मराठीचे नगरी

मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा मिळाल्‍याच्‍या निमित्ताने आपण ‘शासनाने मराठी भाषेच्‍या संवर्धनासाठी काय केले ?’, हे थोडक्‍यात पाहिले. मराठीची सद्यःस्‍थिती पहातांना तिच्‍यावर झालेले परकीय शब्‍दांचे आघात पाहिले. ‘परकीय भाषांच्‍या प्रभावामुळे मराठीच्‍या वाक्‍यरचनेची कशी तोडमोड झाली ?’, हेही समजून घेतले. या भागात मराठी भाषेच्‍या शुद्धलेखनाविषयीच्‍या दुरवस्‍थेविषयीची सूत्रे पाहू.

१. भाषा अशुद्ध लिहिली जाण्‍याची काही कारणे

इंग्रजी भाषेच्‍या शब्‍दातील एखादे अक्षर जरी चुकले, तरी ‘स्‍पेलिंग मिस्‍टेक’ (शब्‍दलेखनातील चूक) म्‍हणून लगेच दाखवण्‍याची पद्धत मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. मराठी भाषेच्‍या संदर्भात मात्र शब्‍दातील उकार, वेलांटी यांचे र्‍हस्‍व, दीर्घ, तसेच आकार आदींमधील चुका या कधी विशेष कुणाला खटकत नाहीत किंवा त्‍याविषयी कधी चर्चा होत नाही. त्‍यामुळे मराठीच्‍या शुद्धलेखनाची दुःस्‍थिती सर्वत्र आढळते. त्‍याविषयीची काही कारणे पुढीलप्र्रमाणे आहेत –

अ. शासनाकडून मराठी भाषेच्‍या शुद्धलेखनासाठी अपेक्षित प्रयत्न न होणे : आतापर्यंतच्‍या सरकारांकडून मराठी भाषेच्‍या शुद्धलेखनाच्‍या दृष्‍टीने अपेक्षित असे प्रयत्न झालेले नाहीत. वर्ष १९६१-१९६२ या कालावधीत शासनाच्‍या साहित्‍य महामंडळाने मराठी शुद्धलेखनाचे नियम काही प्रमाणात पालटले आणि अत्‍यंत साधे-सोपे केले; परंतु त्‍याचा अपेक्षित प्रसार होऊन त्‍याविषयी शिक्षकांचा अपवाद वगळता सरकारसह विशेष कुणीही आग्रही राहिले नाही. ‘शुद्धलेखनाच्‍या संदर्भात तज्ञांमध्‍येही मतमतांतरे होती’, हेही त्‍यामागील एक कारण असावे. पूर्वी सरकारकडून काढलेल्‍या पाठ्यपुस्‍तकांतही काही प्रमाणात अशुद्ध लिखाण होते.

आ. शाळांमध्‍ये मराठीच्‍या शुद्धलेखनाविषयी जागरूकता नसणे : गेल्‍या काही दशकांमध्‍ये काही नावाजलेल्‍या मराठी शाळांचा अपवाद वगळता अन्‍य शाळांमध्‍ये मराठी शुद्धलेखनाविषयी आग्रह धरला गेला नाही. त्‍यामुळे विद्यार्थीदशेपासूनच शुद्ध लिहिण्‍याचा संस्‍कार गेल्‍या काही पिढ्यांवर अपेक्षित असा झालेला नाही. विद्यार्थीदशेपासूनच ‘मराठी भाषा शुद्धच लिहिली गेली पाहिजे’, याविषयीची जाणीव अल्‍प असल्‍यामुळे ‘तिचे लेखन शुद्ध असले काय किंवा अशुद्ध असले काय ?’, मराठी भाषिकांना फारसा काही फरक पडत नाही. पूर्वीसारखे शुद्धलेखन येणारे आणि त्‍याविषयी आग्रही असणारे शिक्षकही आता आढळत नाहीत.

इ. अलीकडच्‍या काळात मराठी भाषिक पालकही शुद्ध लिहिण्‍या-बोलण्‍याविषयी अत्‍यंत उदासीन असल्‍याने मुलांवरही तसा संस्‍कार होण्‍याचा प्रश्‍न येत नाही.

सौ. रूपाली वर्तक

ई. मराठीत लिखाण करतांना शुद्धलेखनाविषयी शंकाही न येणे आणि शब्‍दकोशाचा वापर न करणे : इंग्रजी लिहितांना शंका आल्‍यास पूर्वीपासून अनेक जण शब्‍दकोश (डिक्‍शनरी) आणि आता मायाजाल (इंटरनेट) यांचा वापर करतात; परंतु मराठी शुद्धलेखनाविषयीची जाणीवच नसल्‍याने लिखाणातील शब्‍दांची अचूकता पडताळण्‍यासाठी अपवाद वगळता क्‍वचितच कुणी शब्‍दकोशाचा वापर करत असेल. मराठीत लिखाण करतांना कुणाला शब्‍दातील ‘र्‍हस्‍व-दीर्घ’ अक्षरांविषयी शंकाही येत नाही.

उ. मराठी भाषेत व्‍याकरणाची पुस्‍तके असली, तरी इंग्रजी भाषेतील व्‍याकरणाच्‍या पुस्‍तकांची व्‍याप्‍ती पहाता त्‍या तुलनेत मराठीत ती अत्‍यल्‍प आहेत.

ऊ. व्‍याकरणाच्‍या पुस्‍तकांत मराठी भाषेतील शुद्धलेखन आणि विरामचिन्‍हे यांचे नियम असले, तरी कुणीही ते नियम पाहून कधी लिखाण करू शकत नाही, तसेच भाषेतील सर्वच शब्‍दांचे र्‍हस्‍व, दीर्घ व्‍याकरणाच्‍या पुस्‍तकात देणे शक्‍य होत नाही. त्‍यामुळे ‘अनेक शब्‍द नेमके कुठल्‍या प्रकारे लिहिणे योग्‍य आहे ?’, हे सर्वसामान्‍यांच्‍या लक्षात येतेच असे नाही. त्‍यासाठी विद्यार्थीदशेतच शुद्ध मराठी लिहिण्‍याचा संस्‍कार होणे, तसेच सर्वत्र शुद्ध मराठी लिखाण वाचले जाणे आवश्‍यक आहे.

ए. शासकीय स्‍तरावर सार्वजनिक ठिकाणी काही प्रसारित करण्‍याचे लिखाणही मराठी शुद्धलेखनतज्ञांकडून पडताळले जात नाही, तर संबंधित अधिकार्‍यांकडून पडताळले जाते. त्‍यामुळे त्‍यात शुद्धलेखनाच्‍या बर्‍याच चुका असतात.

ऐ. शुद्ध लिखाणाविषयी संवेदनशीलता आणि भाषाभिमान यांचा अभाव : ‘लिखाण अशुद्ध असल्‍याने लिखाणातून रज-तमात्‍मक स्‍पंदने बाहेर पडतात, त्‍यातील सात्त्विकता न्‍यून होते’, हे समाजाला ठाऊक नसते. ‘मराठी भाषा सात्त्विक आहे, तिच्‍या बोलण्‍यामुळे आपल्‍याला आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ होतो. त्‍यामुळे तिची सात्त्विकता टिकवण्‍यासाठी ती शुद्ध लिहिणे आवश्‍यक आहे’, ही जाणीव आणि ‘भाग्‍यवान आम्‍ही… बोलतो मराठी’, हा भाषाभिमान नसल्‍यामुळे तिच्‍या शुद्ध लिखाणाविषयी मराठीजनांमध्‍ये उदासीनता आढळते.

ओ. ‘नवीन’ या शब्‍दांत काही जण ‘वी’ र्‍हस्‍व काढतात. ‘करून’, ‘घेऊन’ अशा शब्‍दांतील ‘रू’ किंवा ‘ऊ’ र्‍हस्‍व काढतात. ‘स्‍टोअर्स’ हा इंग्रजी शब्‍द काही जण ‘स्‍टोर्स’ असा लिहितात. चुकीच्‍या शब्‍दांची अशी अनेक उदाहरणे देता येतील.

२. वैयक्‍तिक आणि सार्वजनिक ठिकाणच्‍या अशुद्ध लेखनाची उदाहरणे

वृत्तपत्रातील विज्ञापने, विज्ञापनांची विविध पत्रके, वैयक्‍तिक आस्‍थापनांची ओळखपत्रे, इमारतींची नावे, वृत्तवाहिन्‍यांवर दाखवल्‍या जाणार्‍या तळपट्ट्या, बसआगारांमधील सूचना, ‘बेस्‍ट’ बसगाड्यांमधील पाट्या, रस्‍त्‍यांवरील दुकानांच्‍या पाट्या यांवरील लिखाण बर्‍याचदा अशुद्ध असते. काही प्रथितयश वृत्तपत्रांतील लिखाण बर्‍याच प्रमाणात शुद्ध असले, तरी स्‍थानिक वृत्तपत्रांतील लिखाणात बर्‍याच चुका असतात. कथा, कादंबर्‍या, आत्‍मचरित्र आदी मराठी साहित्‍यातील विविध पुस्‍तकांतील लिखाणाचे शुद्धलेखन तपासलेले असले, तरीही ते पुष्‍कळ अशुद्ध असते. शासकीय पत्रके, शासन निर्णय, शासनाचे अहवाल आदींमधील लिखाणही पडताळलेले असले, तरीही त्‍यात शुद्धलेखनाच्‍या चुका असतात. वरील सर्व ठिकाणी विरामचिन्‍हांचा योग्‍य वापरही केलेला नसतो.

३. ‘गूगल’ अक्षरपाटी (की बोर्ड)चा वापर करून टंकलेखन करतांना चुकीचे शब्‍द प्रसारित होणे

भ्रमणभाषवरून संदेश पाठवतांना किंवा सामाजिक माध्‍यमांत लिखाण करतांना बर्‍याचदा ‘गूगल’ अक्षरपाटी (की बोर्ड)चा वापर करून टंकलेखन केले जाते. प्रत्‍येक वेळी शुद्ध शब्‍द टंकलेखन करून समोर येतोच असे नाही. त्‍यामुळे बर्‍याचदा अशुद्ध टंकलेखन पुढे पाठवले जाते. कित्‍येकांना शब्‍दांचे ‘र्‍हस्‍व-दीर्घ’ ठाऊक नसल्‍यानेही अशुद्ध टंकलेखन पुढे पाठवले जाते. ‘शुद्ध लिहिले पाहिजे’, ही जाणीव नसल्‍यानेही अशुद्ध लिखाण टंकलेखन केले जाते. ते तसेच सर्वत्र प्रसारित होऊन वाचले जाते. अशा तर्‍हेने अशुद्ध लिखाणाचा सर्वत्र प्रसार होत असतो.

४. मराठी जनमानसात लिखाण शुद्ध असण्‍याविषयीची असंवेदनशीलता

एकंदरीत काय, तर ‘मराठी भाषेचे लिखाण शुद्ध असले पाहिजे’, याविषयीची जाणीव, संवेदनशीलता मराठी जनमानसात विशेष कुठे आढळत नाही. इंग्रजी भाषेतील ‘स्‍पेलिंग’विषयी प्रत्‍येक जण जागरूक असला, तरी ‘मराठी भाषेत लिखाण करतांना र्‍हस्‍व, दीर्घ, विरामचिन्‍हे आदी दृष्‍टीने लिखाण शुद्ध हवे’, हे कित्‍येक जणांच्‍या गावीही नसते. ‘लिखाण शुद्ध असले पाहिजे’, असा कडक नियम किंवा धोरण मोठी वृत्तपत्रे वगळता अन्‍य कुठे फारसे नसते.

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.१.२०२५)