Priest Body Taken Out From Samadhi : केरळमध्ये स्थानिकांच्या मागणीमुळे समाधीस्थानातून बाहेर काढण्यात आला वृद्ध पुजार्‍याच्या मृतदेह !

शवविच्छेदनाच्या अहवालानंतर सत्य कळणार

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे पुजारी गोपन स्वामी यांचा मृतदेह समाधीस्थान खोदून बाहेर काढला !

थिरूवनंतपूरम् (केरळ) : येथे ६९ वर्षीय गोपन स्वामी नावाच्या पुजार्‍यांनी समाधी घेतल्याची माहिती मिळाल्यावर शेजार्‍यांनी पोलिसांत तक्रार केली. शेजार्‍यांचा दावा आहे की, गोपन स्वामी गेल्या काही मासांपासून आजारी होते. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे स्वामी यांचे बांधण्यात आलेले समाधीस्थान खोदून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावर याविरोधात कुटुंबियांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. यावर न्यायालयाने आदेश देत यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी समाधीस्थान खोदून आतमध्ये असलेला गोपन स्वामी यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनास पाठवला आहे.

‘वैकुंडा स्वामी धर्मप्रचार सभे’चे अध्यक्ष विष्णुपूरम् चंद्रशेखरन्

‘वैकुंडा स्वामी धर्मप्रचार सभे’चे अध्यक्ष विष्णुपूरम् चंद्रशेखरन् यांनी सांगितले की, एका आध्यात्मिक गुरूंचा अपमान झाला आहे. समाधीवरून वाद निर्माण करणार्‍यांना इतिहास क्षमा करणार नाही. आम्ही आता गोपन स्वामी यांच्या महासमाधीची योजना आखली आहे. याला अनेक स्वामी आणि आश्रमाचे प्रमुख उपस्थित रहातील.